लक्ष द्या : मोबाईलचा अतिरेक घातक; मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम

पुणे: जगाला जवळ आणणारा आणि दैनंदिन आयुष्य सुलभ करणारा स्मार्टफोन आता आरोग्यासाठी मोठा धोका बनत चालला आहे. मोबाईलच्या सततच्या वापरामुळे तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक जण शारीरिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जात आहेत. सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांवर ताण येतो, कोरडेपणा जाणवतो, दृष्टी कमजोर होते आणि डोकेदुखीचा त्रास वाढतो.

मान खाली घालून मोबाईल वापरण्याच्या सवयीमुळे ‘टेक्स्ट नेक’ (Text Neck) नावाचा आजार वाढला आहे. यात मान आणि पाठीच्या दुखण्याची समस्या निर्माण होते. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने झोपेचे वेळापत्रक बिघडते, निद्रानाश आणि सततचा थकवा जाणवतो. एकेकाळी केवळ सोयीचे साधन असलेला मोबाईल आज अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे.

मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम : मोबाईलच्या अतिरेकामुळे मानसिक आरोग्यावरही गंभीर परिणाम होतात. मानसोपचार तज्ज्ञ सांगतात की सोशल मीडियावर सतत सक्रिय राहिल्याने ‘FOMO’ (Fear of Missing Out) वाढतो, ज्यामुळे चिंता आणि नैराश्याचा धोका वाढतो. प्रत्यक्ष संवादाचा अभाव, नात्यांतील दुरावा आणि सामाजिक अंतर हीही मोठी समस्या झाली आहे. कुटुंबातही मोबाईलच्या व्यसनामुळे संवाद कमी होत असल्याचे दिसून येते.

मुलांवर सर्वाधिक परिणाम : लहान मुलांसाठी ही सवय अधिक हानिकारक ठरत आहे. एकाग्रतेचा अभाव, शैक्षणिक प्रगतीवर विपरीत परिणाम, सोशल मीडियावरील सायबर बुलिंग आणि मैदानी खेळांपासून दुरावा – हे सगळे परिणाम आता सर्रास दिसतात. शारीरिक व मानसिक विकासावर याचे दूरगामी दुष्परिणाम होतात.

उपाययोजना : तज्ज्ञांच्या मते, स्क्रीन टाइमला मर्यादा घालणे, नियमितपणे मोबाईलपासून ब्रेक घेणे, अनावश्यक नोटिफिकेशन बंद ठेवणे आणि जेवणासारख्या महत्त्वाच्या क्षणी मोबाईल बाजूला ठेवणे आवश्यक आहे. हे पाऊल उचलल्यास मोबाईलच्या अतिरेकामुळे होणारे दुष्परिणाम कमी करता येऊ शकतात.