खडकवासला येथे 375 खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय उभारले जाणार; पुणे महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

प्रतिनिधी| मानस मते: खडकवासला, पुणे: पुणे महानगरपालिकेच्या वारजे प्रभाग क्रमांक 30 येथील स.नं. 79/ब आर-7 अंतर्गत सुमारे 10,910 चौ. मीटर क्षेत्रफळावर मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारले जाणार आहे. 375 बेडचे हे आधुनिक रुग्णालय ‘डिझाइन, बिल्ट, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर’ (DBFOT) या तत्वावर उभारण्यात येणार असून, यामुळे पुणे शहरातील गरीब व गरजू रुग्णांना माफक दरात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

रुग्णालयाचे आराखडे व सुविधा:

  • निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, पात्र निविदाधारक या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे.
  • रुग्णालयातील 10% खाटांवर उपचार पूर्णतः मोफत, 6% खाटा सीजीएचएस (CGHS) दराने, आणि उर्वरित खाटा खाजगी दराने उपलब्ध असतील.
  • सर्व यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाची जबाबदारी निविदाधारकावर असणार आहे.

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:

  • 30 वर्षांच्या कराराअंतर्गत हे रुग्णालय चालवले जाणार असून, त्यानंतर संपूर्ण मालमत्ता महापालिकेकडे हस्तांतरित होईल.
  • सुमारे 4,00,000 चौ. फुटांचे बांधकाम अपेक्षित असून, यामध्ये इंटिरिअर, फर्निचर, वैद्यकीय उपकरणे आणि आधुनिक सुविधा समाविष्ट आहेत.
  • प्रकल्पाचा अंदाजित खर्च 350 कोटी रुपये असून, तो 3 वर्षांच्या आत पूर्ण केला जाणार आहे.
  • भारतामध्ये प्रथमच, जर्मनी आणि नेदरलँड्ससारख्या युरोपीय देशांनी थेट महापालिकेच्या प्रकल्पात सहभाग घेतला आहे.
  • रूरल एन्हान्सर्स कंपनीमार्फत 83 दशलक्ष युरोचा वित्तीय पुरवठा केला जाणार आहे.
  • नेदरलँड्स सरकारने 90% राजकीय आणि व्यावसायिक जोखमीचा विमा (Political & Commercial Risk Coverage) घेतला आहे.
  • रुग्णालयाचे व्यवस्थापन आंतरराष्ट्रीय हॉस्पिटल संस्थेद्वारे केले जाईल.
  • 60,000 स्क्वेअर फुटांचे ‘हीलिंग गार्डन’, तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा मानसिक आरोग्य विभाग प्रकल्पात समाविष्ट आहे.

उपलब्ध होणाऱ्या सुविधा:

रुग्णालयात खालील प्रमुख विभाग व सेवा उपलब्ध असतील:

  • रेडिओलॉजी, कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, युरॉलॉजी, सर्जरी, पिडियाट्रिक्स, ऑर्थोपेडिक्स, गायनॅकॉलॉजी, NICU, ICU, तसेच अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर.
  • अनेक सेवा गरजू रुग्णांसाठी पूर्णपणे मोफत असतील.

प्रकल्पातील आर्थिक व्यवस्था:

  • प्रकल्पासाठी राज्य शासनाच्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत.
  • कर्ज महापालिकेच्या खात्यावर घेण्यात आले असले तरी परतफेड निविदाधारकाकडून केली जाणार आहे.
  • प्रकल्पासाठी लागणारी सर्व शुल्के निविदाधारक भरतील.
  • महापालिका, निविदाधारक आणि वित्तपुरवठा करणारी बँक यांच्यात त्रिपक्षीय करारनामा करण्यात येणार आहे.

उत्पन्न आणि फायदे:

  • हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर महापालिकेला दरवर्षी 90 लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल आणि त्यात दरवर्षी 3% वाढ होणार आहे.

हा प्रकल्प पुणे शहराच्या आरोग्यसेवा क्षेत्रात सकारात्मक क्रांती घडवणारा ठरणार आहे.