शिवणे परिसरात ११ वर्षीय मुलगा मुठा नदीत बेपत्ता

शिवणेतील मुठा नदीत बुडालेल्या ११ वर्षीय मुलाचा अद्याप शोध नाही; शोधकार्य सुरूच

(प्रतिनिधी मानस मते) पुणे, शिवणे – शिवणे परिसरातील मुठा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलाचा अद्यापही शोध लागलेला नाही. माउली रामा चव्हाण (वय ११, रा. शिवणे) आणि देव अच्युत सावंत (वय ११, रा. शिवणे) हे दोघे शुक्रवारी (ता. १ ऑगस्ट) दुपारी नदीत पोहायला गेले होते.

दोघांनी कपडे काढून नदीत उडी घेतली. काही वेळात माउली पाण्यात दिसेनासा झाला. त्याचा मित्र देव काही वेळ त्याचा शोध घेत राहिला, मात्र तो न सापडल्याने माउलीचे कपडे घेऊन घरी परतला.

सायंकाळी माउलीची आई घरी आल्यानंतर देवने संपूर्ण प्रकार सांगितला. यानंतर तातडीने उत्तमनगर पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. पोलिस व स्थानिक नागरिकांनी मिळून रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू ठेवले, मात्र माउलीचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही.

पोलिसांकडून आणि स्थानिक प्रशासनाकडून शोध मोहीम अद्याप सुरू असून नदीपात्रात बारकाईने पाहणी करण्यात येत आहे.