ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोडवर रविवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली. घोडबंदर रोडवरील नागला बंदर परिसरात एका डंपरने 21 वर्षीय गजल टुटेजा नावाच्या तरुणीला चिरडले. यात तिचा जागीच मृत्यू झाला. गजल ही तिच्या कुटुंबाचा आधार होती. वडिलांच्या निधनानंतर ती नोकरी करत कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होती. मात्र भीषण अपघातात तिने प्राण गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजल टुटेजा घोडबंदरच्या एका सोसायटीत राहत होती. रविवारी रात्री 10 वाजता ती पेट्रोल पंपाजवळून जात असताना हा अपघात झाला. रस्त्यावर खड्डे असल्याने तिच्या स्कुटीवरील नियंत्रण सुटले आणि ती डंपरखाली आली, असा पोलिसांचा अंदाज आहे. अपघात इतका भीषण होता की गजलच्या शरीराचे दोन तुकडे झाले. घटनेनंतर, तिची आई आणि भाऊ घटनास्थळी पोहोचले. तिच्या आईने एका चादरीत तिचा मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत ठेवला.
गजलच्या भावाने सांगितले की, “मी खाली गेलो, दीदीला खूप फोन लावले, पण तिने फोन उचलला नाही. थोडे पुढे गेलो तेव्हा तिथे गर्दी दिसली. मी त्या गर्दीतून वाट काढत गेलो. तेव्हा मला दिसले की, दीदीच्या अंगावरुन डंपर गेला होता, तिच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. मी लगेच आईला फोन केला.”
गजल एका खाजगी कंपनीत काम करत होती. वडील नसल्यामुळे कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर होती. ती नोकरीसोबत पोळीभाजीचा व्यवसायही करायची. 12 तारखेला तिने वाढदिवसानिमित्त भावाला जेवायला बाहेर जाण्याचा बेत सांगितला होता. “मी दोन मिनिटांत घराच्या खाली येतेय, तू खाली ये, आपण मस्त जेवायला जाऊयात,” असे ती म्हणाली होती. पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं. घराजवळ पोहोचलेल्या गजलचा अपघातात मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातानंतर घोडबंदर रोडच्या दुरवस्थेबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. रस्त्यावरील खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे असे अपघात वारंवार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. गजलच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.