‘आम्ही मुळशीकर’ प्रतिष्ठानच्यावतीने “शाब्बास” गुणगौरव सोहळ्याचे आयोजन

‘आम्ही मुळशीकर’ प्रतिष्ठानच्यावतीने १९ वा “शाब्बास” गुणगौरव सोहळ्याचे आयोजन येत्या २७ जुलै रोजी सायं. ६.०० वा. कोथरूड येथील उत्सव मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. १० वी, १२ वीतील यशवंत विद्यार्थांना शालेय उपयोगी वस्तू तसेच सन्मानचिन्ह देवून त्यांना गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक ॲड. गणेश सातपुते यांनी दिली. 

सातपुते म्हणाले, की “शाब्बास” ही तीनच अक्षरे, काम करुन जातात विद्यार्थ्यांच्या पंखात, बळ देऊन जातात. विद्यार्थी वर्षभर अथक परिश्रम करून परिक्षेमध्ये यशस्वी होतात. पालकांना त्याचे समाधान असतेच. त्या समाधानात भोवतालचा समाजही सहभागी झाला तर तो आनंदोत्सव विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कायम राहतो. पुढील वाटचाल करताना त्याला हीच कौतुकाची शिदोरी उपयोगी पडते. यातून नवीन उर्जा घेऊन तो पुन्हा नवीन शिखरे पादाक्रांत करण्यासाठी सज्ज होतो. त्यासाठी तीनच अक्षरे पुरेशी असतात. शाब्बास

‘आम्ही मुळशीकर’ प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून हेच करीत आहोत. यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा हे त्याचेच प्रतिबिंब आहे. यानिमित्ताने आपण सर्व मुळशीकर मंडळीदेखील एकत्र येतो. विचारांची देवाणघेवाण करतो. म्हणून मुळशी तालुक्यातील विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी या समारंभास अवश्य उपस्थित राहावे असे आवाहन आम्ही मुळशीकर प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष ॲड. गणेश सातपुते यांनी केले आहे.