Pune Crime : ना डिलिव्हरी बॉय, ना लैंगिक छळ; पुण्यात तसलं काही घडलंच नाही, सेल्फीही संमतीनेच, मोठा खुलासा
काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कोंढवा परिसरात एका तरुणीवर डिलिव्हरी बॉयने घरात घुसून लैंगिक छळ केल्याची तक्रार समोर आली होती. मात्र, आता या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. असला काही प्रकार कधी घडलाच नव्हता आणि ही संपूर्ण घटना तरुणीच्या मानसिक अस्थैर्यामुळे उभी राहिल्याचे पोलीस तपासातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात वेगळंच वळण आलं आहे.
बुधवारी (4 जुलै) ही घटना मध्यरात्री 1:30 च्या सुमारास घडल्याचं सांगितलं जात होतं. घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन ट्रेसिंग आणि परिसरातील चौकशी यावरून सत्य समोर आलं. या प्रकाराची माहिती सकाळी 9 वाजता पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर संबंधित तरुणीस सीसीटीव्ही क्लिप दाखवण्यात आली. मात्र, तरुणीने आरोपीला ओळखण्यास नकार दिला.
पोलिसांनी इमारतीतील 44 फ्लॅटमधील रहिवाशांची चौकशी केली. त्यात स्पष्टपणे सांगण्यात आलं की, हा इसम कोणताही कुरियर डिलिव्हरी बॉय नव्हता, तसेच कोणत्याही अधिकृत प्रवेशाविना तेथे आला नव्हता. यानंतर त्याचा मोबाईल लोकेशन ट्रॅक करण्यात आला. ज्यामध्ये बाणेर येथे तो रात्री 3 वाजता ट्रॅक झाला. अधिक तपासात हा आरोपी तरुणीच्या ओळखीचा असल्याचे स्पष्ट झाले.
सेल्फीही सहमतीनेच काढलेला
सेल्फी तिच्या सहमतीने काढले गेले होते आणि त्या फोटोसह असलेला “मी पुन्हा येईन” हा मजकूर खुद्द तरुणीने लिहिल्याचे तिने प्राथमिक जबाबात मान्य केले. तिने पोलिसांना सांगितले की, घटनेच्या वेळी तिची मानसिक अवस्था स्थिर नव्हती म्हणून तिने चुकीची तक्रार दिली.
या प्रकरणात क्राईम ब्रँचचे 200 अधिकारी आणि स्थानिक पोलीस दलातील 300 अधिकारी यांना या तपासासाठी जोडण्यात आले होते. या घटनेबाबत पोलीस विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, ही घटना वास्तव नसून कपोलकल्पित आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा देखील पोलिसांकडून देण्यात आला आहे.