एमपॉवर प्रकल्प मन आणि सीआयएसएफ यांच्या तर्फे 75,000 हून अधिक CISF कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मानसिक आरोग्य सेवा मदत

राष्ट्रीय, 30 जुलै 2025 – आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट (ABET) च्या संस्थापक आणि अध्यक्ष श्रीमती नीरजा बिर्ला आणि सीआयएसएफचे महासंचालक श्री. आर. एस. भट्टी, आयपीएस यांनी संयुक्तपणे एमपॉवर या आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टच्या उपक्रमाद्वारे राबविण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट मन च्या प्रगतीचा आढावा घेतला. नोव्हेंबर 2024 मध्ये सीआयएसएफ आणि ABET यांच्यात झालेल्या सामंजस्य करारांतर्गत या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

एमपॉवरच्या अनुभवी मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या टीमने सीआयएसएफ कर्मचाऱ्यांमध्ये जनजागृती, समुपदेशन, वैद्यकीय मदत आणि प्रशिक्षणाद्वारे मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करायला मदत केली आहे.

प्रोजेक्ट मनने आजपर्यंत 75,000 सीआयएसएफ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत केली आहे. एमपॉवरने 8,506 सीआयएसएफ अधिकारी आणि उप-अधिकाऱ्यांना कमी जोखमीच्या मानसिक आरोग्य समस्या कशा ओळखाव्यात, त्यांचे व्यवस्थापन कसे करावे, तसेच गंभीर मानसिक प्रकरणे तज्ज्ञ व्यावसायिकांकडे कशी पाठवावीत याचे प्रशिक्षण दिले आहे. या दोन-स्तरीय रचनेमुळे अगदी तळागाळापर्यंत मानसशास्त्रीय आधार आणि मदत पोहोचणे शक्य झाले आहे.

IGI विमानतळ, संसद भवन, दिल्ली मेट्रो यांसारख्या अतिसंवेदनशील युनिट्समध्ये संभाव्य मानसिक समस्या ओळखण्यासाठी 21,000 कर्मचाऱ्यांची सायकोमेट्रिक चाचणी घेण्यात आली आहे. या उपक्रमामुळे नैराश्य, वैवाहिक मतभेद, आर्थिक ताणतणाव इत्यादी प्रकरणांमध्ये समुपदेशन आणि आवश्यक मदत, हस्तक्षेप करणे शक्य झाले आहे.

विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे 2024 आणि 2025 या वर्षांमध्ये सीआयएसएफमध्ये आत्महत्या होण्याचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या खाली गेले आहे. त्यावरून या उपक्रमाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे.

प्रोजेक्ट मनचे यश आणि प्रभाव, परिणाम यांच्या पार्श्वभूमीवर DG CISF आणि श्रीमती नीरजा बिर्ला यांनी हा उपक्रम पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित करताना DG CISF म्हणाले, “आमच्या कर्मचाऱ्यांसाठी मानसिक आरोग्य हे शारीरिक तंदुरुस्तीइतकेच महत्त्वाचे आहे. या उपक्रमातून आमची अंतरिक शक्ती, मदत प्रणाली बळकट होत असून आमचे कर्मचारी मानसिकदृष्ट्या खंबीर, निश्चित ध्येय असलेले आणि कामासाठी सज्ज राहतील हे सुनिश्चित केले जात आहे.”

एमपॉवर, ABETच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती नीरजा बिर्ला म्हणाल्या, “मानसिक आरोग्यसेवेचा विचार जेव्हा संस्थात्मक पातळीवर केला जातो तेव्हा काय साध्य होऊ शकते याचे उदाहरण म्हणजे सीआयएसएफबरोबरची आमची दीर्घकालीन भागीदारी आहे. गेल्या तीन वर्षांत प्रोजेक्ट मनने सीआयएसएफच्या युनिट्समध्ये देशभर 24×7 हेल्पलाइन, समुपदेशन, सायकोमेट्रिक स्क्रिनिंग आणि पीअर एंगेजमेंटद्वारे 75,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना मानसिक आरोग्य सेवा पुरवली आहे. सीआयएसएफने त्यांच्या दैनंदिन प्रणालीमध्ये वेलनेस प्रोटोकॉल्स आणि स्वास्थ्य सेवा समाविष्ट करत समग्र आरोग्यविषयी दाखवलेली बांधिलकी उल्लेखनीय आहे. त्यामुळे आत्महत्येच्या घटनांमध्ये 40% घट झाल्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.”