पिंपरी-चिंचवड : चाकण औद्योगिक क्षेत्रातीलल वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यासाठी भाजपा महायुती सरकार ‘ ऑन ॲक्शन मोड’वर आले आहे. दि. 30 जुलै रोजी मुंबई येथे सांर्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये सर्व संबंधित विभागांची एकत्रित बैठक नियोजित केली आहे. चाकण औद्योगिक क्षेत्राचे या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
– सार्वजनिक बांधकाम मंत्री, उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत पहिली बैठक
– भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद
चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयी-सुविधांबाबत निर्माण झालेल्या गंभीर समस्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपा आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला. गेल्या आठवड्यात विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली होती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सविस्तर चर्चा करुन ‘‘ॲक्शन प्लॅन’’ निश्चित करण्याबाबत मागणी केली होती. त्यानुसार, आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू केला होता.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये संबंधित सर्व विभागांची बैठक नियोजित केली आहे. या बैठकीत निश्चितपणे धोरणात्मक निर्णय होतील, अशी अपेक्षा आहे. गत पावसाळी अधिवेशनामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवडमधील विधानसभा सदस्यांनी आवाज उठवला होता. त्यामुळे चाकण आणि औद्योगिक क्षेत्राच्या प्रश्नांना वाचा फुटली आहे.
या बैठकीला अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, सचिव (रस्ते), सार्वजनिक बांधकाम विभाग, मुख्य अभियंता, एमएसआयडीसी, मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, पुणे, मुख्य अभियंता, एमआयडीसी, पुणे, प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे, पोलीस उपायुक्त (वाहतूक), पिंपरी-चिंचवड, मुख्य अधिकारी, चाकण / तळेगांव नगरपालिका असे प्रमुख अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.