Maharashtra New Expressway : महाराष्ट्रात नव्या महामार्गाची घोषणा: 12 जिल्ह्यांतील 8615 हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग 100% क्षमतेने सुरू झाल्यानंतर आता राज्यात आणखी एक महत्त्वाचा महामार्ग तयार होणार आहे. नागपूर ते गोवा दरम्यान शक्तीपीठ महामार्ग उभारण्यात येणार असून, हा ग्रीनफिल्ड प्रवेश-नियंत्रित एक्सप्रेसवे असणार आहे.
8615 हेक्टर जमिनीचे भूसंपादन
वर्धा जिल्ह्यातील पवनारपासून सिंधुदुर्गमधील पत्रादेवीपर्यंत 802 किमी लांबीचा हा महामार्ग असेल. या प्रकल्पासाठी १२ जिल्ह्यांतील ३९ तालुक्यांतील ३७१ गावांमधून मार्ग जाणार असून, एकूण ८६१५ हेक्टर जमिनीचे भूसंपादन होणार आहे. यामध्ये:
-
८१४९ हेक्टर जमीन खाजगी
-
३३८ हेक्टर शासकीय जमीन
-
१२८ हेक्टर वन विभागाची जमीन आहे.
सर्वाधिक आणि किमान भूसंपादन जिल्ह्यानुसार:
जिल्हा | जमीन (हेक्टर) |
---|---|
सोलापूर | 1689 |
यवतमाळ | 1423 |
कोल्हापूर | 1262 |
परभणी | 742 |
सांगली | 556 |
धाराशिव | 461 |
हिंगोली | 430 |
वर्धा | 435 |
लातूर | 414 |
बीड | 411 |
नांदेड | 387 |
सिंधुदुर्ग | 399 |
धार्मिक पर्यटनाला चालना
हा महामार्ग राज्यातील तीन प्रमुख शक्तीपीठे आणि इतर तीर्थक्षेत्रांना जोडणार आहे. परिणामी, धार्मिक पर्यटनासह वाहतूक व्यवस्थाही अधिक सुगम होणार आहे.
कामाची वेळ आणि प्रक्रिया
या प्रकल्पाची अंमलबजावणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) करणार आहे. काम सुरू झाल्यानंतर तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. सुरुवातीला जमिनीची मोजणी होईल, त्यानंतर शेतकऱ्यांची यादी तयार होईल आणि शेवटी त्यांना भरपाई देऊन जमीन अधिग्रहित केली जाईल.