Ladki Bahin Yojana : राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठा खुलासा झाला असून, तब्बल २६.३४ लाख लाभार्थी अपात्र असतानाही योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने झालेल्या पडताळणीत ही बाब उघडकीस आली असून, या सर्व लाभार्थ्यांचा जून २०२५ पासूनचा लाभ तात्पुरता स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.
महिला व बालविकास विभागाने ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी शासनाच्या विविध विभागांकडून माहिती मागवली होती. या माहितीचे विश्लेषण केले असता अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. काही लाभार्थी एकापेक्षा जास्त शासकीय योजनांचा लाभ घेत होते, काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त सदस्य योजनेसाठी पात्र ठरले होते, तर काही ठिकाणी चक्क पुरुषांनी अर्ज करून लाभ मिळवल्याचे निदर्शनास आले. माहिती तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या अहवालानुसार, अशा अपात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे २६.३४ लाख असल्याचे निश्चित झाले. या माहितीच्या आधारे, जून २०२५ पासून या लाभार्थ्यांचा हप्ता तात्पुरता थांबवण्यात आला आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे पात्र लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. तटकरे यांनी स्पष्ट केले की, राज्यातील सुमारे २.२५ कोटी पात्र बहिणींच्या खात्यात जून महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला आहे. लाभ स्थगित करण्यात आलेल्या २६.३४ लाख अर्जांची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सखोल शहानिशा केली जाईल. या चौकशीत जे लाभार्थी पात्र ठरतील, त्यांचा लाभ पुन्हा सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर कोणती कारवाई करायची, याबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठक होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून यासंदर्भात कठोर निर्णय घेतला जाईल, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.