(प्रतिनिधी मानस) : भारताच्या इस्रो आणि अमेरिकेच्या नासाने संयुक्तपणे विकसित केलेला जगातील सर्वात महागडा आणि अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह NISAR (निसार) आज, ३० जुलै २०२५ रोजी यशस्वीपणे अवकाशात झेपावला. सायंकाळी ५:४० वाजता, श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून GSLV-F16 रॉकेटद्वारे हे प्रक्षेपण पार पडले.
निसार उपग्रह ७४३ किमी उंचीवरील सूर्य-समकालिक कक्षेत १८ मिनिटांत स्थापित करण्यात आला. यामध्ये सुमारे १२,५०० कोटी रुपयांचा खर्च आला आहे. याचे कार्यकाल ५ वर्षांचे असेल.
निसार म्हणजे काय?
‘NISAR’ म्हणजे NASA-ISRO Synthetic Aperture Radar – एक उच्च क्षमतेचा रडार तंत्रज्ञानावर आधारित उपग्रह. याच्या साहाय्याने पृथ्वीवर होणारे सूक्ष्म बदलही नोंदवता येणार आहेत – मग ते घनदाट जंगलं, अंधार, ढग किंवा धूर असो.
उपग्रह ९७ मिनिटांत पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो आणि १२ दिवसांत १,१७३ प्रदक्षिणा करून संपूर्ण पृथ्वीचा सखोल नकाशा तयार करतो.
निसारचे प्रमुख उद्दिष्टे
निसार उपग्रह तीन प्रमुख गोष्टींवर लक्ष केंद्रित करणार आहे:
-
जमिनी व बर्फातील बदल – जमिनीचे खचणे, भूकंप, हिमनद्यांचे वितळणे.
-
भूपरिसंस्था निरीक्षण – शेतजमीन, जंगले, शहरी विस्ताराचे सखोल परीक्षण.
-
सागरी निरीक्षण – समुद्राच्या लाटा, किनारपट्टी बदल आणि सागरी परिसंस्था.
या डेटाचा उपयोग हवामान बदल, पर्यावरणीय धोके आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी केला जाईल. हे सर्व ओपन-सोर्स स्वरूपात सर्व संशोधकांना उपलब्ध असेल.
पारंपरिक उपग्रहांपेक्षा वेगळेपणा
निसार सर्व हवामानात कार्यक्षम असून अंधारातही फोटो घेतो. इतर उपग्रह जे करू शकत नाहीत, ते निसार अत्यंत अचूकतेने करते. तो जवळपास रिअल-टाइममध्ये पृथ्वीवरील सूक्ष्म बदल टिपू शकतो.
निसार उपग्रह कसा काम करतो?
निसारमध्ये १२ मीटर व्यासाचा सोन्याचा रडार अँटेना आहे, जो ९ मीटर लांब बूमवर बसवलेला आहे. तो पृथ्वीवर मायक्रोवेव्ह सिग्नल पाठवतो व परत आलेल्या सिग्नलमधून डेटा गोळा करतो. यासाठी त्याला सूर्यप्रकाशाची आवश्यकता नसते.
या उपग्रहात दोन प्रकारचे रडार आहेत:
-
एल-बँड (NASA) – २४ सेमी तरंगलांबी; जाड जंगलांत शिरकाव.
-
एस-बँड (ISRO) – ९ सेमी तरंगलांबी; सूक्ष्म निरीक्षणासाठी.
त्याच्या मदतीने अगदी १०-१५ सेंमी इतके लहान जमीन हालचाली रंगांच्या स्वरूपात दाखवता येतील –
उदा.
-
हिरवा: जमीन वर आली
-
लाल: वाढलेली चळवळ
-
जांभळा: जमीन खाली गेली
मोहिमेचे चार टप्पे
-
प्रक्षेपण – ३० जुलै रोजी श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण.
-
तैनाती – अंतराळात अँटेना व बूमचे पसरवणे.
-
कमिशनिंग – प्रक्षेपणानंतर ९० दिवस उपग्रहाची तपासणी.
-
विज्ञान कार्य – निरीक्षण सुरू होणे, नियमित डेटा संकलन.
निसारमुळे आता हवामान बदल, वनविकास, नैसर्गिक आपत्ती आणि समुद्र बदल यांचा उत्कृष्ट आणि अचूक मागोवा घेता येणार आहे. भारतासाठी आणि जगासाठी ही एक वैज्ञानिक क्रांती ठरणार आहे!