महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालक व शिक्षकांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील काही जिल्हा परिषद शाळांना सध्या सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर दीड महिन्याची पावसाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर प्रचंड वाढला असून, विशेषतः सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पाटण, महाबळेश्वर आणि जावली तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. डोंगराळ भागांमध्ये झालेल्या या मुसळधार पावसामुळे भूस्खलनाचा धोका निर्माण झाला असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्हा परिषद प्रशासनाने या भागातील ३३४ प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.
या निर्णयानुसार, १ जुलै २०२५ पासून १२ ऑगस्ट २०२५ पर्यंत या शाळा बंद राहणार आहेत. पाटण तालुक्यातील १८६, महाबळेश्वरमधील ११८ आणि जावळीतील ३० शाळांचा यामध्ये समावेश आहे.
दरवर्षीप्रमाणेच, या भागातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पावसाळ्यात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जातो. त्यामुळे या विद्यार्थ्यांना विशेषतः उन्हाळी सुट्टी न देता पावसाळी सुट्टी दिली जाते.
प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता लक्षात घेण्यात आल्याचे दिसून येते. या काळात स्थानिक प्रशासन, शिक्षक आणि पालकांनी संयम बाळगून विद्यार्थ्यांचे संरक्षण सुनिश्चित करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.