Dr. Deepak Tilak Passed Away : लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचं निधन, पुण्यातील राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास

Dr. Deepak Tilak Passed Away : लोकमान्य टिळकांचे पणतू आणि केसरी वृत्तपत्राचे संपादक दिपक टिळक यांचं पुण्यातील राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. दिपक टिळक हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील होते. त्याचबरोबर अनेक संस्थांचे ते विश्वस्त होते. आठ ते अकरा या कालावधीत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी केसरी वाड्यात ठेवण्यात येईल आणि बारा वाजता वैकुंठ स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.

आज, (बुधवारी 16 जुलै) रोजी पहाटेच्या सुमारास त्यांनी पुण्यातील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाल्याची माहिती आहे. डॉ. दीपक टिळक यांच्या पश्चात काँग्रेस नेते असलेले सुपुत्र रोहित टिळक, कन्या, नातवंडे असा परिवार आहे. आज (बुधवारी) सकाळी 8 ते 11 वाजताच्या दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी टिळकवाड्यात ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी बारा वाजल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

डॉ. दीपक टिळक यांचा परिचय

डॉ. दीपक टिळक हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू होते. ‘केसरी’चे विश्वस्त संपादकपद देखील त्यांनी भूषवलं आहे. डॉ. दीपक टिळक हे काही काळ टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती देखील राहिले होते. 2021 मध्ये जपान सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रायलयाकडून जपानी भाषेच्या प्रसारासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

डॉ. दीपक टिळक यांना अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली

‘केसरी’चे विश्वस्त संपादक, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि लोकमान्य टिळक यांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांनी शिक्षण, पत्रकारिता, सामाजिक कार्य या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. टिळक कुटुंबाच्या सामाजिक कार्याचा वारसा त्यांनी प्रामाणिकपणे पुढे नेत, ‘केसरी’सारख्या ऐतिहासिक दैनिकाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, मूल्याधिष्ठित विचार आणि लोकशिक्षणाचा ध्यास जपला, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. दीपक टिळक यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, जपानी भाषेच्या प्रसारासाठी डॉ. दीपक टिळक यांनी केलेल्या कार्याची जपान सरकारनेही दखल घेतली होती. तसेच, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचे समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचे कार्य हे नव्या पिढीसाठी प्रेरणादायी होते. ते एक विचारवंत, कुशल प्रशासक, संवेदनशील पत्रकार आणि समर्पित समाजसेवक होते. त्यांच्या जाण्याने पुणे शहराच्या सार्वजनिक जीवनात पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या परिवाराच्या दुःखात मी सहभागी आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, अशा शोकभावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.