१० दिवसांच्या चिमुकल्याला विळ्याचे ३९ चटके; मेळघाटात अंधश्रद्धेचा कळस

मेळघाटातील दहेंद्री गावात एका दहा दिवसांच्या नवजात बालकावर अघोरी उपचाराचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पोटफुगीच्या त्रासासाठी रुग्णालयात नेण्याऐवजी या चिमुकल्याच्या पोटावर गरम विळ्याचे तब्बल ३९ चटके देण्यात आले. या प्रकारामुळे मेळघाटातील अंधश्रद्धेच्या प्रथांविषयी पुन्हा एकदा तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

या भागात आजही ‘डंबा’ या अघोरी उपचार पद्धतीचा वापर केला जातो. विशेषतः पोटफुगीसारख्या आजारासाठी गरम वस्तूंनी पोटावर चटके दिले जातात. या बाळालाही अशाच पद्धतीने अघोरी उपचार करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर बाळाची प्रकृती सध्या स्थिर आहे.

मोठी बातमी ! ८ आणि ९ जुलै रोजी शाळांना सुट्टी, महाराष्ट्रातील पालक आणि विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, ‘ही’ आहेत कारणं

या घटनेची माहिती तब्बल दहा दिवसांनी समोर आली. पोलिसांनी चटके देणाऱ्या वृद्ध महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, अशा घटना अनेकदा लपवल्या जातात आणि शासन यंत्रणा वेळेवर कारवाई करत नाही.

हा काही अपवाद नाही. यापूर्वीही चार महिन्यांपूर्वी २२ दिवसांच्या बाळाला अशाच प्रकारे चटके दिले गेले होते. ही साखळी सतत सुरू आहे. अशा घटनांमध्ये बाळांचे जीव धोक्यात येत आहेत, हे वास्तव आहे.

या प्रकारांवर तीव्र संताप व्यक्त करत सामाजिक कार्यकर्त्यांनी ‘डंबा’ देणाऱ्या बुवा-बाबा, मांत्रिक, भुमका यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ही प्रथा केवळ अंधश्रद्धेवर आधारित नसून, ही एक अमानवीय क्रूरता असल्याचे ते स्पष्टपणे म्हणतात.

कुपोषणासोबतच अंधश्रद्धेविरुद्धही प्रशासनाने काम करणे गरजेचे आहे. केवळ जनजागृती नव्हे तर कायदेशीर कारवाई व दंडात्मक उपाय यांचीही गरज आहे. या संतापजनक प्रकारांवर कायमचा पायबंद घालण्यासाठी राज्य शासनाने ठोस धोरण राबवावे, अशी मागणी समाजातून होत आहे.