बीएमसीसी मैदान वाचवण्यासाठी युवक काँग्रेसची जोरदार ‘बॅटिंग’; “खेळाच्या मैदानावर इमारत नको!” – मैदानासाठी संघर्ष उफाळला

पुणे, २३ मे २०२५ – शहरातील प्रतिष्ठित बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर होणाऱ्या संभाव्य बांधकामाविरोधात युवक काँग्रेसने आज ठाम भूमिका घेतली. “खेळाच्या मैदानावर इमारत नको!” असा घोष देत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मैदानावरच ‘बॅटिंग’ करत निषेध नोंदवला.

युवक काँग्रेसने स्पष्टपणे सांगितले की, मैदानाच्या एक इंचही जागेवर अतिक्रमण होऊ दिले जाणार नाही. संस्थेने आपली बाजू मांडण्यासाठी १५ दिवसांची वेळ मागितली असली, तरी आम्ही आमच्या भूमिकेपासून ढळणार नाही, असा निर्धार युवक काँग्रेसने व्यक्त केला आहे.

जर गरज भासली, तर आम्ही न्यायालयात जाऊ आणि हजारो माजी विद्यार्थी, नागरिक यांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा युवक काँग्रेसच्या नेतृत्वाने दिला आहे. बीएमसीसी मैदान हे अनेक वर्षांपासून खेळाडूंना घडवणारे, विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाचे केंद्र राहिले आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणतेही बांधकाम न करता मैदानाचे अस्तित्व जपले जावे, हीच मागणी आंदोलकांची आहे.

युवक काँग्रेसच्या या आंदोलनाला माजी विद्यार्थ्यांपासून ते स्थानिक नागरिकांपर्यंत मोठा प्रतिसाद मिळत असून, पुढील काळात या मुद्द्यावर आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.