पुणे – वैष्णवी हगवणे (Vaishnavi Hagawane Death) आत्महत्याप्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या हगवणे कुटुंबातील राजेंद्र हगवणे व सुशील हगवणे यांना आश्रय देणाऱ्या पाच जणांना दोन दिवसांपूर्वी बावधन पोलिसांनी अटक केली होती. आता या पाचही आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, या आरोपींमध्ये कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जामंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील याचाही समावेश आहे.
राजेंद्र आणि सुशील हगवणे हे पोलिसांपासून फरार असताना, त्यांना लपवून ठेवण्यात मदत केल्याच्या आरोपाखाली प्रीतम पाटील, मावळ येथील फार्महाउस मालक बंडू फाटक, पुसेगाव (जि. सातारा) येथील राहुल जाधव, अमोल जाधव आणि तळेगाव दाभाडे येथील मोहन भेगडे या पाच जणांना पोलिसांनी अटक केली होती.
सदर प्रकरणात मंगळवारी न्यायालयाने या सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र, गुन्हा जामीनपात्र असल्यामुळे पोलीस कोठडीच्या मागणीला न्यायालयाने नकार दिला. त्यानंतर आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्यावर सुनावणी घेत न्यायालयाने प्रत्येकी २५,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर सर्वांना जामीन मंजूर केला आहे.
या निर्णयामुळे प्रकरणात एक नवा टप्पा समोर आला असून, हगवणे कुटुंबाच्या मदतीसाठी कोण कोण सक्रिय होते, याबाबत आणखी तपासाची गरज असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.