जिच्या रेप-मर्डर केसमध्ये तिघांना झाला तुरुंगवास, ती पीडिता 18 महीन्यानंतर जीवंत परत आली, धक्कादायक मर्डर मिस्ट्री

By: Editor_Pratik

On: Wednesday, May 28, 2025 5:34 PM

police-case-file-photos.jpg
Google News
Follow Us

जिच्या रेप-मर्डर केसमध्ये तिघांना झाला तुरुंगवास, ती पीडिता 18 महीन्यानंतर जीवंत परत आली, धक्कादायक मर्डर मिस्ट्री

मध्य प्रदेशच्या झाबुआ जिल्ह्यात 2023 मध्ये एका युवतीच्या अपहरणानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह सापडल्याचे वृत्त आले होते. नातलगांनी मृतदेहाची ओळख पटवून अंत्यसंस्कारही पार पाडले. याप्रकरणी बलात्कार आणि खूनाचा गुन्हा दाखल होऊन तिघा तरुणांना अटक झाली होती. तपास पूर्ण होऊन खटला अंतिम टप्प्यावर आला होता. पण अठरा महिन्यांनंतर ही युवती अचानक जिवंत परतल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

पोलिसांसमोर अनपेक्षित प्रश्न

या युवतीच्या पुनरागमनामुळे पोलिसांसमोर तीन मोठे प्रश्न उभे ठाकले आहेत:

ही मुलगी तब्बल १८ महिने कुठे होती?

जिच्या मृतदेहाचे अंत्यसंस्कार करण्यात आले, ती तरुणी कोण होती?

त्या मृतदेहाची ओळख तिच्या कपड्यांवरून कशी पटली?

ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू केली असून, आधी दाखल केलेली फाईल पुन्हा उघडण्यात आली आहे.

युवतीने सांगितलेले धक्कादायक सत्य

ज्या युवतीला मयत समजण्यात आले होते, ती स्वतः पोलीस ठाण्यात आधारकार्ड आणि मतदान ओळखपत्र घेऊन पोहोचली. तिने सांगितले की, ऑगस्ट 2023 मध्ये ती आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. कोटा येथे एका ठिकाणी तिला एका वर्षासाठी डांबून ठेवण्यात आले आणि तिच्यावर बलात्कार झाला. नंतर तिला पाच लाख रुपयांना विकण्यात आले. शेवटी तिने दलालाच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि परत आली.

“मी मेली नव्हते, मीच खरी पीडित आहे” — युवतीचा खुलासा

घरात परतल्यानंतर तिला समजले की, तिचे अंत्यसंस्कारही झाले आहेत. तिचे कपडे त्या मृत मुलीकडे कसे पोहोचले, याबाबत तिलाही काही कल्पना नाही. “मी जिवंत आहे, आणि या सर्व प्रकारात मीच खरी पीडित आहे,” असे स्पष्ट तिने पोलिसांना सांगितले.

खटला अंतिम टप्प्यात, पण सत्य समोर

या प्रकरणात बलात्कार आणि खूनाचा खटला निर्णयाच्या टप्प्यावर आहे. केवळ एक साक्षीदार उरलेला असून, त्याची साक्ष होण्याआधी ही माहिती समोर आली. या अनपेक्षित घडामोडीमुळे पोलिसांनी ताजा अहवाल सादर केला. त्याच्या आधारे मध्य प्रदेश हायकोर्टाच्या इंदूर खंडपीठाने अटकेत असलेल्या तिघांपैकी एका आरोपीला जामीन मंजूर केला आहे आणि तपास सुरू ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

हा प्रकार केवळ तपासातील त्रुटीच नव्हे तर मानवी जीवनातील एक विचित्र आणि वेदनादायक सत्य अधोरेखित करणारा आहे. आता उर्वरित दोघांवर काय निर्णय होतो आणि खरी मृत युवती कोण, याचा उलगडा होणे गरजेचे ठरले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now