बॉयफ्रेंडसोबत बिर्याणी खायला रेस्टॉरंटमध्ये गेली अन् घात झाला…

पालघरमधून एक अत्यंत दु:खद आणि धक्का देणारी घटना समोर आली आहे. बिर्याणी खाण्याच्या वेळी एका 27 वर्षीय तरुणीच्या घशात चिकनचा तुकडा अडकून तिचा श्वास घेणं बंद झालं आणि तिला आपला जीव गमवावा लागला.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित तरुणी तिच्या प्रियकरासोबत एका रेस्टॉरंटमध्ये बिर्याणी खाण्यासाठी गेली होती. सुरुवातीला दोघेही आनंदाने जेवत होते. मात्र अचानकच त्या तरुणीच्या घशात चिकनचा एक मोठा तुकडा अडकला आणि तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

घटनास्थळीच ती बेशुद्ध पडली आणि रुग्णालयात नेण्याआधीच तिने अखेरचा श्वास घेतला. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केलं.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, मुलीच्या अचानक मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या भावना वर्णन करता न येणाऱ्या आहेत.

पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेतली असून, अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

पोलिस निरीक्षक विजया गोस्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहोत. चिकनचा तुकडा घशात अडकल्यामुळे मृत्यू झाला की अन्य काही कारण आहे, हे रिपोर्ट आल्यानंतरच निश्चित होईल. तसेच, या घटनेत कोणताही निष्काळजीपणा झाला आहे का, याचाही तपास केला जात आहे.”

ही घटना इतरांसाठी धोक्याची जाणीव देणारी असून अशा प्रसंगी तातडीने योग्य वैद्यकीय मदत मिळणं किती आवश्यक आहे, हे अधोरेखित करते.