Pune Rain | पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात आज पडलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण तालुक्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः भिगवण, स्वामी चिंचोली आणि म्हसोबाचीवाडी या भागांत पावसाचा जोर अधिक जाणवत असून, रस्ते, घरे आणि मंदिरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे.
भिगवण परिसरातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेला सर्व्हिस रोड तब्बल ३ किलोमीटरपर्यंत पाण्याखाली गेला आहे. बसस्थानक परिसरात पाणी साचल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. काही घरांमध्ये पाणी शिरल्याने स्थानिकांनी स्वतःच्या प्रयत्नाने पाणी बाहेर काढण्यास सुरुवात केली असून, एका घराची भिंत कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, पुण्यातील ताडीवाला रोड परिसरात आज पहाटे सहा वाजता एका अरुंद गल्लीमध्ये ८ महिन्यांची गर्भवती गाय अडकली होती. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. गल्ली अतिशय अरुंद (केवळ 1.5 ते 2 फूट) असल्याने गायीला बाहेर काढणे मोठे आव्हान ठरले. सेफ्टी बेल्ट, दोर, पुली यांसारख्या उपकरणांचा वापर करून बचावकार्य सुरू करण्यात आले. नंतर वाईल्डलाइफ रेस्क्यू टीम आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने गल्लीतील अडथळे दूर करून तब्बल १० तासांच्या प्रयत्नांनंतर गायीची सुटका करण्यात यश आले. गायीच्या सुरक्षिततेमुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
पावसामुळे स्वामी चिंचोली येथे पुणे-सोलापूर महामार्गावर एक तासाहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती. अनेक वाहनचालक अडकले होते. स्थानिक प्रशासनाच्या मदतीने वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली. म्हसोबाचीवाडी गावात आजपर्यंत इतका पाऊस कधीही पडला नव्हता. गावातील ओढ्याला नदीचे स्वरूप आले असून काही मंदिरे आणि घरे पूर्णतः पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे गावातील नागरिक अडचणीत सापडले आहेत.
या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी NDRF टीम सतर्क असून स्थानिक प्रशासन घटनास्थळी सतत नजर ठेवून आहे. नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, असा इशारा देण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष पथक कार्यरत आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, त्यामुळे नागरिकांनी अधिक सावध राहावे, असे प्रशासनाने सांगितले आहे. मदत आणि पुनर्वसन कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.