Murderous Father : दक्षिण सोलापूरमधून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. कुसूर गावात सख्ख्या मुलीचा खून केल्याची ही खळबळजनक बाब उघड झाली आहे. एका बापाने आपल्या अनैतिक संबंध उघड होऊ नयेत म्हणून चक्क स्वतःच्या ९ वर्षांच्या मुलीला ठार मारल्याची घटना संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारी आहे.
⚠️ अनैतिक संबंधाची साक्ष – पोटच्या गोळ्याचा बळी
कुसूर गावात शुक्रवारी संध्याकाळी एका ९ वर्षीय मुलीचा मृतदेह जमिनीत पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र शवविच्छेदनात गळा दाबून हत्या केल्याचे स्पष्ट झाले.
पोलीस तपासात असे निष्पन्न झाले की, श्रावणी या चिमुकलीने आपल्या बापाला आणि आजीसोबत नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. हा प्रकार तिने इतरांना सांगू नये, म्हणून तिच्यावर आधी बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर तिला गळा दाबून मारण्यात आलं. आरोपीने घरासमोरच खड्डा खणून तिचा मृतदेह पुरून टाकला.
👮 पोलिसांची तत्परता, आरोपी अटकेत
गावातील पोलीस पाटील महानंदा पाटील यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पोलिसांना कळवले. मंद्रूप पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर आरोपी ओगसिद्ध कोठे याला अटक करण्यात आली.
त्याच्यावर कलम १०३(१) आणि २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीची पत्नी वनिता कोठे हिने पोलिसांना सर्व घटना कथन केली असून तिच्या जबाबाच्या आधारे गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला आहे.