‘चंगळ्या बोले कुहू’ फेम शुभम माळवे आणि त्यांच्या आईला कायदेशीर नोटीस; प्रतीक्षा शिंदे यांचा फसवणुकीचा गंभीर आरोप

पुणे – सोशल मीडियावर “चंगळ्या बोले… कुहू” या व्हिडीओमुळे प्रसिद्ध झालेल्या शुभम माळवे यांच्यावर आता कायदेशीर कारवाईची टांगती तलवार आहे. पुण्यातील प्रतीक्षा शिंदे नावाच्या महिलेने शुभम माळवे आणि त्यांच्या आईवर बदनामी आणि फसवणुकीचे गंभीर आरोप करत कायदेशीर नोटीस बजावली आहे.

प्रतीक्षा शिंदे यांचा आरोप काय?

प्रतीक्षा शिंदे यांच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम माळवे आणि त्यांची आई यांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओमध्ये प्रतीक्षा आणि तिचे पती विजय शिंदे यांचे थेट नाव घेत बदनामीकारक आणि खोटे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे प्रतीक्षा शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाची सार्वजनिक प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

नोटीसची प्रमुख मागणी

प्रतीक्षा शिंदे यांच्या वतीने पाठवलेल्या नोटीसीत शुभम माळवे आणि त्यांच्या आईने ७ दिवसांच्या आत या संपूर्ण प्रकाराबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा, कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

वादग्रस्त व्हिडीओमध्ये काय होतं?

एक व्हिडीओ सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी अपलोड करण्यात आला होता. त्यात शुभमच्या आई निर्मला माळवे म्हणतात, “चंगळ्या २००८ हे आयडी माझ्या भावाचा मुलगा विजय चालवत होता. माझ्यावर आत्या म्हणून विश्वास ठेव म्हणून सांगितलं जात होतं. चंगळ्याला पुण्याला नेलं, काही दिवस तो चांगला राहिला. पण त्याच्या पत्नीने म्हणजेच प्रतीक्षा शिंदे हिने त्याला मारहाण केली, आणि त्याची बॅगसुद्धा दिली नाही.”

या विधानामुळे प्रतीक्षा शिंदे यांचे नाव थेट सार्वजनिकपणे घेतल्याने त्यांची मानहानी झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

आणखी एक व्हिडीओही चर्चेत

दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये निर्मला माळवे यांनी, “चंगळ्या २००८ आयडी बंद झालं आहे. त्या आयडीवरून आमची फसवणूक झाली आहे, त्यामुळे कोणीही ते फॉलो करू नये. आता आमचं खरं आयडी चंगळ्या ११ आहे,” असं सांगितलं. यामुळे सोशल मीडियावर एकाच कुटुंबाविषयी दोन विरुद्ध प्रतिक्रिया उमटत आहेत.

शुभम माळवे कोण आहे?

“चंगळ्या बोले… कुहू” या लोकप्रिय रील्समधून ओळख निर्माण करणारा शुभम माळवे इंदापूर तालुक्यातील डिकसळ गावचा आहे. सोशल मीडियावर त्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. मात्र, आता त्याच्यावर आणि त्यांच्या आईवर वादग्रस्त व्हिडीओमुळे कायदेशीर कारवाईचा धोका निर्माण झाला आहे.

या संपूर्ण प्रकरणाकडे सोशल मीडियावर मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे. आता शुभम आणि त्याच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.