कात्रज (Katraj Flyover) : कात्रज चौकातील सहापदरी उड्डाणपुलाच्या कामाचा शुभारंभ २४ सप्टेंबर २०२१ रोजी झाला होता. सुरुवातीस हे काम २४ फेब्रुवारी २०२४पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, वेळोवेळी कामास होणाऱ्या अडथळ्यांमुळे दोनदा मुदतवाढ देण्यात आली असून, आता हे काम डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या डिसेंबर २०२५ ही नव्याने मंजूर झालेली मुदत असली तरी, भूसंपादनाच्या प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे त्यात आणखी वाढ होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) स्पष्ट केलं आहे की, जर जूनच्या पूर्वार्धात सर्व संबंधित जागा ताब्यात आल्या, तर पुढील सहा महिन्यांत काम पूर्ण करता येऊ शकते. पण प्रत्यक्षात, भूसंपादन विभागाकडून प्रक्रिया संथगतीने सुरू आहे.
सध्याची स्थिती आणि अडथळे:
पुलाचे काम सध्या जवळपास अर्ध्यावर आले आहे. परंतु, राजस सोसायटी चौकातील ११ मालमत्ता अडथळा ठरत असून, त्यातील केवळ ७ जागा ताब्यात घेतल्या गेल्या आहेत. उर्वरित जागांसाठी प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारीत चालू आहे. मालमत्ता विभागाकडून जागांची मोजणी नुकतीच पार पडली आहे.
पूलाचे तपशील:
एकूण निधी: ₹१६९.१५ कोटी (केंद्र सरकारकडून)
मार्ग: वंडरसिटी ते माऊली गार्डन
एकूण लांबी: १३२६ मीटर
रुंदी: २५.२० मीटर (सहापदरी)
दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रस्ते: ७ मीटर
स्लीप रस्ता: वंडरसिटी ते कात्रज चौक दरम्यान ५.५ मीटर रुंद
कामाचा प्रगतीचा आलेख:
कार्यारंभ आदेश: २५ फेब्रुवारी २०२२
सद्यस्थिती: एकूण १९ गाळ्यांपैकी १० गाळ्यांचे काम पूर्ण
सर्वात अवघड समजला जाणारा कात्रज चौकातील टप्पा पूर्ण
नागरिकांचा संताप आणि अपेक्षा : वाहतूक कोंडीचा त्रास सहन करत असलेल्या परिसरातील नागरिकांकडून कामाला गती देण्याची जोरदार मागणी केली जात आहे. महापालिका, जिल्हा प्रशासन व इतर संबंधित विभागांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन होत आहे.
प्रशासकीय प्रतिक्रिया:
“जागांचे भूसंपादन आता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सुरू आहे. जूनच्या पहिल्या पंधरवड्यात जागा ताब्यात मिळाल्यास आम्ही डिसेंबर २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.”
– श्रुती नाईक, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण