लातूर – माजलगावचे माजी आमदार आर.टी. देशमुख यांचा भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. औसा तालुक्यातील बेलकुंडजवळ रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हा अपघात झाला. मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर पाणी साचले होते. या पाण्यातून जात असताना गाडीवरील नियंत्रण सुटून फॉर्च्युनर कार पाच ते सहा वेळा उलटली आणि गंभीर अपघात घडला.
या अपघातात आरटी देशमुख गाडीच्या बाहेर फेकले गेले आणि उलटणाऱ्या गाडीचा धक्का लागून ते गंभीर जखमी झाले. गाडी त्यांच्या अंगावरच पडल्याची भीषण घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कार त्यांच्या अंगावरून हटवली आणि तातडीने लातूरच्या सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
देशमुख यांच्यासोबत गाडीत असलेले चालक आणि अंगरक्षक दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
ही दुर्घटना तुळजापूरहून बीडकडे जात असताना घडली. पावसामुळे उड्डाणपुलावरून खाली उतरताना साचलेल्या पाण्याने गाडी घसरली आणि नियंत्रण सुटून कार पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला, दरवाजे, छत आणि समोरील भाग पूर्णपणे तुटले.
या दुर्दैवी घटनेमुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. आरटी देशमुख हे माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार होते आणि त्यांनी स्थानिक पातळीवर अनेक वर्षे सक्रिय राजकारण केले होते.