मोठी बातमी! वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पती शशांकच्या अडचणीत वाढ; आणखी एका फसवणुकीचा आरोप

पुण्यातील विवाहित तरुणी वैष्णवी हगवणेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ माजली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिचा पती शशांक हगवणे, दीर सुशील हगवणे, सासरा राजेंद्र हगवणे, सासू लता हगवणे आणि नणंद करिष्मा हगवणे यांना अटक केली आहे.

दरम्यान, आज पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणे यांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने या तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे पोलीस कोठडीत असून 31 मे पर्यंत कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

आणखी एक गुन्हा – जेसीबी व्यवहारातील फसवणूक

शशांक हगवणे याच्यावर आणखी एक गंभीर आरोप समोर आला आहे. प्रशांत एळवंडे यांनी शशांकवर जेसीबी व्यवहारात 11 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा दावा केला आहे. या प्रकरणात आता महाळुंगे चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नेमकं काय घडलं?

25 लाख रुपयांत जेसीबी विक्रीचा सौदा ठरला होता.

प्रशांत एळवंडे यांनी शशांकला प्रारंभी 5 लाख रुपये दिले आणि त्यानंतर दरमहा 50 हजार रुपये हप्त्याच्या स्वरूपात देत राहिले.

मात्र, शशांकने बँकेचे हप्ते न भरल्यामुळे बँकेने जेसीबी जप्त केला.

शशांकने तो जेसीबी पुन्हा सोडवून घेतला, पण प्रशांत यांचे पैसे परत केले नाहीत.

एवढंच नाही तर, शशांकने बंदुकीचा धाक दाखवून धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणामुळे शशांक हगवणेची अडचण आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोलिसांनी नव्या गुन्ह्याची दखल घेतली असून पुढील कारवाईचा मार्ग स्पष्ट होणार आहे.