BIG NEWS : पोलिसांनी २५ नवऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महिलेला केली अटक; बनावट लग्न रॅकेटचा उलगडा

BIG NEWS : पोलिसांनी २५ नवऱ्यांची फसवणूक करणाऱ्या महिलेला केली अटक; बनावट लग्न रॅकेटचा उलगडा

  • राजस्थान लग्नानंतर लाखो रुपयांची रोख रक्कम व दागदागिने घेऊन पळाली

  • पोलिस तपासात मोठ्या बनावट लग्न रॅकेटचा उलगडा

‘लेडीज व्हर्सेस रिकी बहल’ या बॉलीवूड चित्रपटासारखी घटना प्रत्यक्षात घडली आहे — फक्त या वेळी फसवणूक करणारी स्त्री आहे. राजस्थान पोलिसांनी मंगळवारी एका महिलेला अटक केली असून, तिने तब्बल २५ नवऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

ही ‘लुटेरी दुल्हन’ म्हणजेच लुटणारी नववधू, अनुराधा नावाची महिला आहे. ती उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्याची रहिवासी असून, तिला मध्य प्रदेशमधील भोपाळ येथून अटक करण्यात आली. आश्चर्य म्हणजे तिच्याविरुद्ध आतापर्यंत फक्त एकच गुन्हा दाखल आहे — राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्यातील मंटौन पोलीस ठाण्यात.

फसवणुकीचे जाळे – लग्न आणि लुट

तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, ३ मे रोजी विष्णू शर्मा नावाच्या व्यक्तीने तक्रार दाखल केली. त्यानुसार, सुनिता (मध्य प्रदेश) आणि पप्पू मीणा (राजस्थान) यांनी त्याला वधू शोधून देण्याचे आमिष दाखवले आणि अनुराधाचा फोटो दाखवून लग्नासाठी राजी केले.

२० एप्रिल रोजी सवाई माधोपूर कोर्टाच्या परिसरात बनावट लग्न घडवून आणले गेले. यासाठी विष्णूकडून २ लाख रुपये घेतले. मात्र, लग्नानंतर फक्त १२ दिवसांनी, म्हणजेच २ मे रोजी, अनुराधा विष्णूच्या घरातून दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल घेऊन फरार झाली.

‘फसवणूक करून लग्न करणाऱ्या’ टोळीचा पर्दाफाश

पोलीस तपासात उघड झालं की, भोपाळमध्ये बनावट लग्नाचं मोठं रॅकेट कार्यरत आहे. सुनिता आणि पप्पूसारखे ब्रोकर स्थानिक एजंटमार्फत नवऱ्यांचा शोध घेतात, आणि त्यांच्याकडून २ ते ५ लाख रुपये घेऊन लग्न लावून देतात. काही दिवसांनी वधू रोख रक्कम आणि दागिने घेऊन निघून जाते.

अटक कशी झाली?

अनुराधाला पकडण्यासाठी राजस्थान पोलिसांनी एक बनावट वर तयार केला. एक कॉन्स्टेबल वर म्हणून विवाह दलालांशी संपर्क साधला. त्याला अनेक फोटो दाखवले गेले, ज्यात अनुराधाचाही समावेश होता.

अखेर अनुराधाला भोपाळमध्ये अटक करण्यात आली. ती गब्बर नावाच्या दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करून त्यालाही २ लाखांनी फसवून त्याच्या घरी राहात होती.

पुढील तपास सुरू

अनुराधाला राजस्थानला आणण्यात आले असून, या प्रकरणाचा तपास करताना बनावट विवाह रॅकेटातील इतर सदस्यांवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.