BIG NEWS : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी : लवकरच उभारली जाणार देशातील पहिली आणि सर्वात मोठी एव्हिएशन गॅलरी

BIG NEWS : पुणे – लवकरच पुणे शहरात देशातील पहिली आणि सर्वात मोठी एव्हिएशन गॅलरी उभारली जाणार आहे. केंद्रीय हवाई परिवहन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती माध्यमांशी बोलताना दिली. या उपक्रमामुळे पुणे हवाई वाहतुकीतील महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या गॅलरीच्या माध्यमातून नागरिकांना हवाई वाहतूक, विमानतळ रचना, भारतीय वायुसेना तसेच आंतरराष्ट्रीय विमानसेवा याबाबत माहिती मिळणार आहे. गॅलरीत विमानांच्या प्रतिकृती, उड्डाणविज्ञान, विमानतळांमागील तांत्रिक बाबी आणि वायुसेनेची माहिती यांचे सादरीकरण केले जाईल. यामुळे हवाई क्षेत्राबद्दल जनजागृती होईल.

या प्रकल्पासाठी पुणे महानगरपालिकेने ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि सध्या गॅलरीचे काम अंतिम टप्प्यात आहे. एकदा पूर्ण झाल्यावर ही गॅलरी पुणेकरांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरेल आणि शैक्षणिकदृष्ट्याही उपयुक्त ठरेल.

मंत्री मोहोळ यांनी यावेळी आणखी माहिती देताना सांगितले की, पुण्यात सर्वाधिक हेलिकॉप्टर असल्याने स्वतंत्र हेलिपोर्ट उभारण्याचा विचार सुरू आहे. यासाठी योग्य ठिकाण निश्चित करण्याचे काम सुरू आहे.

पुणे विमानतळाच्या धावपट्टीचे विस्तारीकरण करण्यासाठीचे ओएलएस सर्वेक्षण पूर्ण झाले असून, भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या सर्व उपाययोजनांमुळे पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा वाढवण्यास मदत होणार आहे.

या उपक्रमांमुळे पुणे शहर हवाई वाहतूक क्षेत्रात एक महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित होईल आणि नागरिकांना या क्षेत्राची माहिती व समज वाढेल, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.