पुण्यात खळबळ : खून करून बायकोचा मृतदेह फेकला दरीत

By: Editor_Pratik

On: Sunday, April 27, 2025 11:34 AM

Google News
Follow Us

पुण्यात खळबळ : खून करून बायकोचा मृतदेह फेकला दरीत

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील काळाशी येथे घडली. नराधम पतीने पहिल्यांदा पत्नीचा गळा आवळून खून केला. याप्रकरणी प्रियांका करे यांच्या हत्येच्या आरोपामध्ये पती ज्योतीराम करे आणि त्याचा मित्र दत्तात्रय गोलांडे अशा दोघांना अटक करण्यात आले आहे.

ज्योतीराम करे याने खुनानंतर पत्नीचा मृतदेह नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील घाटात सुमारे दीडशे फूट खोल दरीमध्ये फेकल्याचे पुढे तपासात आढळून आले. पत्नीचा खून करून, ती हरवल्याची उलटी तक्रार ज्योतीराम करे याने इंदापूर पोलीस ठाण्यात दिली. या खून प्रकरणातील गूढ इंदापूर पोलिसांनी तीन महिन्यांनंतर उलगडले आहे.

२०१३ मध्ये इंदापूर तालुक्यातील चितळकरवाडी येथील प्रियांका शिवाजी चितळकर हिचा विवाह इंदापूर तालुक्यातील कळाशी येथील ज्योतीराम करे याच्याशी झाला होता. त्यानंतर त्यांना दोन मुलेदेखील झाली होती. दरम्यान, मागील काही महिन्यांपासून ज्योतीराम करे याचा पत्नी प्रियांकाच्या चारित्र्यावर संशय होता. यातून दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. त्यानंतर २९ जानेवारी २०२५ रोजी ज्योतीराम करे याने इंदापूर पोलिसात आपली बायको हरवल्याची तक्रार दाखल केली होती. प्रियांका करे हरवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर, इंदापूर पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, ही महिला हरवली नाही तर तिचा खून झाला असावा, असा संशय इंदापूर पोलिसांचा वाढला. पोलिसांनी त्या दृष्टीने आपला तपास सुरू केला. पोलिसी खाक्या दाखवताच ज्योतीरामने तोंड उघडले आणि बायकोचा खून केल्याचे कबूल केले.

नांदगावच्या डोंगरदऱ्यांची होती चांगली माहिती

या प्रकरणाचा तपास करताना आरोपी पती ज्योतीराम करे हा सातत्याने पोलिसांना खोटी माहिती देत होता. कबुली दिल्यानंतर, मृतदेह हस्तगत करण्यासाठी शेवटी पोलीस त्याला घेऊन नाशिकच्या नांदगाव परिसरातील डोंगर घाटात पोहोचले. तब्बल दीडशे फूट खोल दरीत फेकलेला कुजलेल्या अवस्थेतील प्रियंकाचा सांगाडा पोलिसांनी बाहेर काढला. ज्योतीराम करे हा साखर कारखान्याला ऊस पुरवठ्यासाठी ट्रॅक्टर चालवतो. त्यामुळे त्याला या परिसराची चांगली माहिती होती. आपल्या आणखी एका मित्राच्या सहाय्याने त्याने नांदगावच्या डोंगरदरीत प्रियांकाचा मृतदेह फेकला. प्रियांकाचा शोध लावणे हे इंदापूर पोलिसांसमोर एक आव्हान होते, मात्र, तीन महिन्यांनंतर पोलिसांनी प्रियांका हरवली नाही, तर तिची हत्या झालीय याचा तपास लावला आणि थेट प्रियांकाचा सांगाडाच पोलिसांच्या हाती लागला. याप्रकरणी इंदापूर पोलिसांनी ज्योतीराम करे आणि दत्तात्रय गोलांडे या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

 

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now