Pakistan People in Pune | पुण्यात राहतात चक्क १११ पाकिस्तानी नागरिक
पुणे : पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून परत जाण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पुण्यात सद्यस्थितीला तब्बल १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास आहेत. त्यातील ९१ पाकिस्तानी दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आले आहेत. तर तिघा जणांनी आतापर्यंत भारत देश सोडला असल्याचे पुणे शहर पोलीस दलातील परकीय नागरिक विभागाकडून सांगण्यात आले.
पाकिस्तानी नागरिक प्रामुख्याने नातेवाईकांकडे तसेच वैद्यकीय कारणासाठी दीर्घ मुदतीवर भारतात येत असतात़. पहेलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. त्यांनी केलेल्या गोळीबारात 30 पर्यटकांचा मृत्यु झाला. या हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. पाकीस्तानची सर्वबाजूने कोंडी करण्यास सुरूवात केली आहे. अटारी -वाघा सीमेवरील तपासणी केंद्र तत्काळ बंद करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. तिथून प्रवेश केलेल्या पाकिस्तानी नागरिकांना १ मेपर्यंत मायदेशात परत जाता येईल, असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे.
परदेशातून आलेल्या कोणत्याही नागरिकांना ते ज्या शहरात जातात, तेथील जवळच्या पोलीस आयुक्तालय किंवा अधीक्षक कार्यालयात नोंद करावी लागते. तसेच एका शहरातून दुसऱ्या शहरात जायचे असेल तरी तशी नोंद करावी लागते. याशिवाय वेळोवेळी पोलिसांकडून परदेशी नागरिक त्यांनी दिलेल्या पत्त्यावर वास्तव करीत आहेत ना, ज्या कारणासाठी ते आले आहे, त्याव्यतिरिक्त इतर काही करत नाहीत ना, याची तपासणी केली जाते.
पुण्यात आलेल्या १११ पाकिस्तानी नागरिकांपैकी बहुतांश नागरिक दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेले आहेत. दीर्घ मुदतीचा व्हिसा हा पाच वर्षांसाठी दिला जातो़ तर व्हिजिटर व्हिसा ९० दिवसांसाठी दिला जातो. भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी ३५ पुरुष आणि ५६ महिला या दीर्घ मुदतीच्या व्हिसावर भारतात आले आहेत. तर २० पाकिस्तानी व्हिजिटर व्हिसावर आले आहेत. केंद्र सरकारने पाकिस्तानी नागरिकांना भारत देशा सोडून जाण्याचे आदेश दिले असले तरी याबाबत अद्याप परराष्ट्र विभाग आणि मुंबई परकीय नागरिक विभागाकडून गुरूवारी रात्री उशीरापर्यंत कोणतीही माहिती आलेली नाही, असे पुणे पोलिसांच्या परकीय नागरिक विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, परराष्ट्र विभाग आणि मुंबई परकीय नागरिक विभागाच्या निर्धारित नियमानुसार याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे देखील पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दीर्घ मुदतीच्या व्हिसावर आलेले – ३५ पुरुष, ५६ महिला
व्हिजिटर व्हिसावर आलेले – २० नागरिक