पुण्यात बनावट फॅशन इव्हेंटचा सुळसुळाट; पैसे घेऊन अनेक तरूण-तरुणींचा मानसिक छळ; आयोजकांचे अनेक कारनामे ‘पुणे प्रहार’ करणार उघड
पुण्यात फॅशन शोच्या नावाखाली तरुण-तरुणींना गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. आकर्षक करिअर आणि प्रसिद्धीचे स्वप्न दाखवत अनेक आयोजकांकडून सहभागासाठी मोठ्या प्रमाणावर नोंदणी शुल्क वसूल केले जात आहे, मात्र स्पर्धा पूर्ण न होता किंवा पारितोषिकांची आश्वासने पूर्ण न करता आयोजक फरार होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत.
अलीकडेच एका प्रसिद्ध मॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कथित ‘फॅशन वॉक’ मध्ये सहभागी झालेल्या अनेक स्पर्धकांनी आपली फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली आहे. आयोजकांनी “नॅशनल लेव्हल” स्पर्धांचे आमिष दाखवत प्रत्येकी ५ ते १५ हजार रुपयांचे शुल्क आकारले. मात्र कार्यक्रमाआधीच आयोजकांचा पत्ता कट झाला.
फसवणुकीचे शिकार झालेले काही स्पर्धक म्हणाले, “आम्हाला प्रोफेशनल फोटोशूट, मॉडेलिंग प्रोजेक्ट्स आणि फिल्म ऑफर्स देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण नंतर ना कार्यक्रम पार पडला ना पैसे परत मिळाले.”
पोलिसांनी प्राथमिक चौकशीत काही ठोस धागेदोरे मिळवले असून, लवकरच दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. याप्रकरणी संबंधित आयोजकांवर फसवणूक व विश्वासघाताच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, सोशल मीडियावर या स्पर्धांचे भडक जाहिरातबाजी केली जात असून, युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी खोट्या प्रलोभनांचा वापर केला जात आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नोंदणीपूर्वी स्पर्धेचे organizer व credential नीट तपासण्याचे आवाहन केले आहे.
फॅशन क्षेत्रातील तज्ज्ञांनीही या घटनांवर चिंता व्यक्त केली असून, खऱ्या व्यासपीठाची निवड करताना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
लवकरच नावांसह पुरावे प्रसिद्ध होणार
यासंदर्भातील ठोस पुरावे आणि संबंधितांची नावे लवकरच ‘पुणे प्रहार’ समोर आणणार आहे. तोपर्यंत, सर्व मॉडेल्स आणि आयोजकांनी सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. कोणाची फसवणूक झाली असेल आणि त्यांना न्याय हवा असेल त्यांनी ७२७६३१४१४२ यावर संपर्क करावा अथवा. puneprahar2018@gmail.com यावर पुराव्यांसह माहिती द्यावी.