गटशेतीचे नवे धोरण आणून आर्थिक मदत वाढवू : देवेंद्र फडणवीस

By: Editor_Pratik

On: Monday, March 24, 2025 7:32 AM

देवेंद्र फडणवीस
Google News
Follow Us

पुण्यात ‘सत्यमेव जयते शेतकरी चषक’ पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचे सूतोवाच
पाणी फाऊंडेशनचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात करणार, संस्थापक आमीर खानची घोषणा

राज्य शासनाच्या वतीने 2016 सालापासून वीस शेतकरी व 100 एकर जमीन असेल तर गटशेतीला आतापर्यंत एक कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येत होते. आता राज्य सरकार गटशेतीचे नवे धोरण आणणार असून आर्थिक मदत वाढवू. त्यातून गटशेतीला आपण आंदोलनाचे स्वरूप देऊ, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केली.

बालेवाडी येथील शिवछत्रपती शिवाजी क्रीडा संकुलात येथे पाणी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित ‘सत्यमेव जयते शेतकरी चषक २०२४’च्या भव्य पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आमीर खान आणि किरण राव यांनी स्थापन केलेली ही संस्था २०१६ पासून दुष्काळमुक्त आणि समृद्ध महाराष्ट्र घडविण्याचे काम करत आहे.

कृषिमंत्री श्री. माणिकराव कोकाटे, सह्याद्री फार्म्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विलास शिंदे, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक श्री. शांतीलाल मुथा आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्यासह आमीर खान, किरण राव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मनोरंजन आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनी या कार्यक्रमात ग्लॅमरची भर घातली. यावेळी मान्यवरांनी सर्व सहभागी शेतकरी गटांचे कौतुक केले. तसेच त्यांनी त्यांच्या एकतेचे कौतुक केले आणि शेतीमुळे निर्माण झालेल्या अनिश्चितता आणि आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतीतील सामूहिकीकरण कसे महत्त्वाचे आहे यावर भर दिला.

यंदाच्या शेतकरी चषक स्पर्धेत महाराष्ट्रातील ४६ तालुक्यांतील ४,३०० पेक्षा अधिक शेतकरी गटांनी (सुमारे २००० महिला गट) भाग घेतला. यात सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील तेरती या गावातील ‘भाग्योदय शेतकरी गट’ संघाने राज्य पातळीवरील प्रथम पारितोषिक पटकावत २५ लाख रुपयांचे रोख पारितोषिक, तसेच प्रतिष्ठेची शेतकरी चषक ट्रॉफी जिंकली. सातारा जिल्ह्यातील भोसरे (ता. खटाव) येथील सरसेनापती प्रतापराव गुजर महिला शेतकरी गट आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोबलगाव (ता. खुलताबाद) या दोन संघांना संयुक्तरीत्या १५ लाख रुपयांचे राज् पातळीवरील द्वितीय पारितोषिक देण्यात आले.

तर हिंगोली जिल्ह्यातील कवडा (ता. कळमनुरी) येथील जय बिरसा मुंडा शेतकरी गट आणि वाशिम जिल्ह्यातील नागी (ता. मंगरूळ पीर) येथील माऊली शेतकरी गटाने संयुक्तरीत्या १० लाख रुपयांचे तृतीय पारितोषिक जिंकले.सर्व महिला गटांना दोन राज्यस्तरीय पारितोषिके आणि तालुकास्तरीय प्रत्येकी ५० हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाणी फाऊंडेशनच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि अखिल महाराष्ट्र स्पर्धेचे अधिकृतरीत्या उद्घाटन केले. शाश्वत पाणी व शेती पद्धतीतील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी सर्व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. जमिनीवर मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणण्यासाठी फाऊंडेशनसोबत सकारात्मक सहकार्य सुरू ठेवण्याची कटिबद्धताही त्यांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, “मी आधीपासून आमीर खान यांना सांगत होतो तुमची क्षमता संपूर्ण महाराष्ट्राची आहे. आज माझी इच्छा पूरी केल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. पाणी फाऊंडेशनचा जलसंधारणाचा विचार सर्वत्र झपाट्याने पसरला पाहिजे. जोपर्यंत शेतकरी व लोक पाण्याचे शास्त्र शिकत नाहीत, जलसंधारणात लोकसहभाग वाढत नाही तोपर्यंत महाराष्ट्र दुष्काळीच राहील. राज्य सरकारच्या वतीने शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. ईश्वरानंतर खरी सृजनशीलता कोणामध्ये असेल तर ती बाळाला जन्म देणाऱ्या आईमध्ये आणि पिकाला जन्म देणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये असते. शेती व जलसंधारणाच्या क्षेत्रात आमची एक लाख माणसे काम करत आहेत. त्यांना आम्ही पाणी फाऊंडेशनच्या मागे उभे करू.”

यावेळी बोलताना पाणी फाऊंडेशनचे संस्थापक आमीर खान यांनी २०२६ पासून पाणी फाऊंडेशन आपले कार्य संपूर्ण महाराष्ट्रात करणार असल्याची महत्त्वाची घोषणा केली. यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी चषक स्पर्धेचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यातून त्यांना प्रशिक्षण मिळेल आणि एकरी खर्च कमी करण्यासाठी आणि एकरी उत्पादकता आणि उत्पन्न सुधारण्यासाठी ज्ञान मिळेल.”

श्री. आमीर खान आणि किरण राव यांनीही आपल्या भाषणात शेतकऱ्यांचे अभिनंदन केले. श्री. खान यांनी पाणी फाऊंडेशनच्या व्यापक दृष्टीकोनाबद्दल सांगितले. आर्थिक आणि पर्यावरणदृष्ट्या सक्षम महाराष्ट्र घडविण्यासाठी फाऊंडेशन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते सर्व तालुकास्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. पाणी फाऊंडेशनच्या कार्याला शासनाच्या वतीने संपूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

पाणी फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सत्यजित भटकळ यांनी संस्थेच्या कार्याचा प्रभाव मांडताना २०२४ मध्ये शेतकरी चषकात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना १०० कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त नफा झाल्याचे नमूद केले. संस्थेचे मुख्य सल्लागार डॉ. अविनाश पोळ यांनी शेतकरी गट स्पर्धेच्या चौकटीबाहेर जाऊन लघुउद्योग व आर्थिक उपक्रम उभारण्यासाठी कसे विलक्षण कार्य करीत आहेत, याची माहिती दिली.

‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय मराठी मालिकेच्या टीमने सादर केलेले प्रहसन तसेच पाणी फाऊंडेशनने सादर केलेला मल्टिमीडिया परफॉर्मन्स हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. या सादरीकरणात महाराष्ट्रातील तीन महिला शेतकऱ्यांनी आपल्या जिद्दीच्या आणि यशाच्या कहाण्या सांगितल्या, तसेच सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक फुलवा खामकर व त्यांच्या पथकाने मनमोहक संगीत, गीत तसेच नृत्य सादर केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026

March 13, 2026