उपमुख्यमंत्रींच्या बारामती शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीला उत ,भर चौकात कोयता हातात घेऊन गुंडांनी माजवली दहशत !

पुणे प्रहार डेस्क – सध्याचे युग हे डिजिटल युग आहे. आपल्यापैकी अनेक जण सोशल मीडिया नेट वर्किंग साईटचा तसेच वेगवेगळ्या ॲप्लिकेशनचा प्रामुख्याने वापर करत असतात परंतु एक सुजाण नागरिक म्हणून सोशल मीडियाचा वापर करत असताना काही बंधन पाळणे अत्यंत गरजेचे आहे.

जर आपण चुकीच्या काही गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत असाल तर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत आपल्याला शिक्षा होऊ शकते परंतु समाजात वावरत असताना आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, जे समाजामध्ये तेढ निर्माण करणारे मेसेज, काही फोटोज, स्टेटस म्हणून ठेवत असतात अशावेळी दंगा होण्याची शक्यता जास्त असते. अशीच एक घटना बारामती शहरात घडली आहे.

बारामती शहरातील चार युवकांनी हातामध्ये कोयता धरून फोटो काढल्याची घटना वायरल झाली आहे आणि त्याचबरोबर या चार युवकांनी हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याने एकच खळबळ उडाली आहे म्हणूनच बारामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेसबुक इंस्टाग्राम व व्हाट्सअप या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून शस्त्र हातामध्ये घेऊन स्टेटस ठेवणाऱ्या या चार तरुणांविरोधात तक्रार नोंदविण्यात आली आहे तसेच प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे परंतु योग्य जमीनदार उपस्थित न करू शकल्या कारणाने या चौघांना थेट मध्यवर्ती कारागृहा म्हणजेच येरवडा येथे नेण्यात आले आहे. याप्रकरणाचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादर करत आहेत.

यश दीपक मोहिते, शुभम उर्फ बाळू काळू जगताप आदित्य राजू मांढरे व अनिकेत केशवकुमार नामदास अशी आरोपी असलेल्या युवकांची नावे आहेत यांना सध्या तुरुंगात रवाना करण्यात आलेले आहेत.

बारामती पोलीस स्टेशन हद्दीत भर बाजारामध्ये हातामध्ये कोयता घेऊन मिरवल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यानंतर सोशल मीडियावर हातात शस्त्र घेऊन पोस्ट केल्याने देखील माहिती तंत्रज्ञान कायदा अंतर्गत यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. समाजात अशांतता निर्माण होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाय देखील करणे गरजेचे आहे व त्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन देखील पोलीस अधिकारी यांनी केले आहे. सायबर सेलच्या माध्यमातून तरुणांनी कोणत्याही प्रकारचे हातामध्ये शस्त्र अस्त्र घेऊन फोटो पोस्ट करू नये किंवा जातीवाचक शिवीगाळ, मानवी अधिकार – कर्तव्य यांचे उल्लंघन होईल असे कृत्य करू नये, अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती देखील बारामती पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी दिली आहे.

जर नागरिकांनी कोणत्याही सूचनेचे उल्लंघन केल्यास अशा व्यक्तींचे स्क्रीन शॉट घेऊन शक्ती नंबरवर किंवा प्रभारी अधिकारी यांना फोटो पाठवल्यास योग्य ती कारवाई देखील केली जाईल, असे बारामती शहर पोलिसांनी म्हटले.

समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये याकरिता पालकांनी, शिक्षकांनी तसेच नागरिकांनी शक्ती नंबरचा वापर करण्याचे आवाहन देखील केले आहे. त्याचबरोबर शाळा महाविद्यालय येथे टवाळखोरी करणारे मुले, मुलींचे छेड करणारे, रॅगिंग, उघड्यावर मद्य पान करणाऱ्या युवकांची माहिती व फोटो शक्ती नंबर 9209394917 वर पाठवावी त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.