शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठे भगदाड पडले असुन शिवसेनेचे (ठाकरे गट ) माजी जिल्हाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) पक्षात प्रवेश केला आहे .
मुंबई येथे अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत माऊली कटके व त्यांच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. त्यामध्ये शिवसेनेसह (ठाकरे गट) राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( शरद पवार गट ) कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
त्यामध्ये पेठचे आदर्श सरपंच सुरज चौधरी ,नायगावचे आदर्श सरपंच गणेश चौधरी ,उद्योजक सुजित चौधरी , संतोष हागवणे सुनिल हगवणे , वडगाव रासाई ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य रवींद्र शेलार ,कोलवडीचे लोकनियुक्त सरपंच विनायक गायकवाड , माजी उपसरपंच नाना गायकवाड आदींचा समावेश असुन यामुळे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ,हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर उपस्थित होते .
येणाऱ्या विधानसभेत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित दादा गट ) सुटणार असल्याची शक्यता असून माऊली कटके हे महायुती कडून निवडणूक लढविणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपलेली असताना शिरूर हवेलीच्या राजकारणामध्ये झपाट्याने बदल घडत आहेत, या मतदारसंघात महाविकास आघाडी कडून उमेदवारी फायनल झाल्यानंतर अनेक बदल घडू लागले आहेत.
मोठी मतदार संख्या असणाऱ्या वाघोली गावांमधील इच्छुक उमेदवार माऊली कटके यांनी आज महाविकास आघाडी मधील शिवसेना उद्धव ठाकरे गटाला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटामध्ये जाहीर प्रवेश केल्याने राजकीय समिकरणे बदलली आहेत.
त्यामुळे शिरूर – हवेली विधानसभा मतदार संघामध्ये आमदारकीची निवडणूकी मध्ये जोरदार लढत पहायला मिळण्याची शक्यता असून संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे .कटके यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची होणार अशी चिन्हे दिसत आहेत . कटके यांच्या पक्षप्रवेशामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे .