५ व्या अलिबाग लघुपट महोत्सवात अत्तर या कलाकृतीची निवड झाली असून या लघुपटाचे स्क्रीनिंग देखील अलिबाग या ठिकाणी होणार आहे. काही दिवसांपूर्वी इजिप्त येथील ब्रिटिश यूनिवर्सिटी इंटरनेशनल स्टूडेंट्स फिल्म फेस्टिवलमध्ये अत्तर लघुपटाची निवड करण्यात आली होती. आता अलिबाग फेस्टिवलमध्ये अत्तरची निवड झाल्याने अत्तरच्या टीमवर कौतुकांचा वर्षाव होतोय. याबद्दल चित्रपटाचे लेखक दिग्दर्शन रामकुमार शेडगे यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
गटारात काम करणाऱ्या वडिलांच्या आयुष्यात सुगंधाची दरवळ आणण्यासाठी धडपडणाऱ्या मुलीच्या संघर्षाची कहाणी ‘अत्तर’ मध्ये मांडण्यात आली आहे. अत्तरमध्ये बालकलाकाराच्या प्रमुख भूमिकेत मीरा शेडगे आपल्याला पाहावयास मिळणार आहे. या अगोदर आपल्याला मीरा काही जाहिरातीमध्ये काम करताना दिसली होती. त्याच बरोबर पुरुषोत्तम बाबर, अभिनेत्री रेवा बर्गे, विनय सोनवणे, रमेश साठे, सिराज कसबे असे कलाकार आहेत.
५ व्या अलिबाग लघुपट महोत्सव रविवारी ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ४ वाजेर्यंत चित्रपटांचे स्क्रीनिंग होणार असून पुरस्कार वितरण समारंभ सायंकाळी ५.०० वाजता सँडिस कॉटेज, रेवस रोड, अलिबाग या ठिकाणी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडणार आहे. अशी माहिती ५ व्या अलिबाग लघुपट महोत्सवाचे आयोजक योगेश बारस्कर यांनी दिली आहे.