अप्परकेस लगेजला मिळाले ९० लाख अमेरिकी डॉलरचे बळ

  1. या गुंतवणुकीने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ब्रँडच्या विकास आणि किरकोळ व्यापार विस्ताराला मिळणार चालना
  2. बॅकपॅकच्या १०,००० कोटी रुपयांच्या बाजारपेठेतील लक्षणीय वाटा मिळविण्याचे कंपनीचे लक्ष्य

नाविन्यपूर्ण, शाश्वत लगेजच्या अप्परकेस या ब्रँडने सिरीज बी फेरीमध्ये जागतिक व्हेंचर कॅपिटल कंपनी अॅक्सेलच्या नेतृत्वाखाली ९० लाख अमेरिकी डॉलर उभे केले आहेत. या निधी पुरवठ्यामुळे भारतातील आपल्या ग्राहकवर्ग विस्ताराच्या ध्येयानुसार कंपनीच्या व्यापार वाढवायला आधार मिळेल.

मुंबईची ही कंपनी सध्या ऑनलाईन आणि भारतभरातील १८०० मल्टी ब्रँड स्टोअरच्या माध्यमातून ट्रॅव्हल गिअरची विक्री करते. पुढील तीन वर्षात २५० एक्सक्लूझिव्ह रिटेल स्टोअरच्या माध्यमातून ५०० कोटी रुपयांचे लक्ष्य गाठण्याची कंपनीची योजना आहे.

नाविन्यपूर्ण, ग्राहककेंद्रित देखण्या डिझाईनच्या माध्यमातून लगेजच्या बाजारपेठेला संजीवनी देण्यासाठी अप्परकेसची सुरुवात झाली होती. साचेबद्ध आणि एकसुरी शैलींपेक्षा वेगळ्या प्रयोगशील आणि ग्राहककेंद्रित डिझाईन ती उपलब्ध करून देते.

हा ब्रँड शाश्वततेसाठी कटिबद्ध आहे, त्यामुळे पर्यावरणस्नेही कार्यपद्धतीवर तो भर देतो. याशिवाय, अप्परकेस किफायतशीरपणावर केंद्रित आहे, त्यामुळे व्यापक ग्राहक वर्गाला उच्च दर्जाचे व फॅशनेबल ट्रॅव्हल केअर उपलब्ध होतील याची हमी मिळते.

अॅक्सेलच्या नेतृत्वाखालील ९० लाख अमेरिकी डॉलर सिरीज बी फेरीमुळे अप्परकेसचा एकूण निधी पुरवठा तिच्या स्थापनेनंतर तीन वर्षांनी आता १५० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

अप्परकेसचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक सुदीप घोष म्हणाले, “शाश्वत ट्रॅव्हल केअर उद्योगात आम्ही क्रांती घडवून आणत असताना अॅक्सेल आमच्या सोबत आली, याचा आम्हाला आनंद आहे. ही गुंतवणूक म्हणजे आमचा पर्यावरण स्नेही दृष्टिकोन आणि शंभर टक्के मेड इन इंडिया बिझनेस मॉडेल यांवर असलेल्या विश्वासाचे प्रतिबिंब आहे.

आमच्या एक्सक्लुझिव्ह रिटेल चॅनेलचा विस्तार करून आमचा ब्रँड आणि वितरण वाढविण्यासाठी आम्हाला या भागीदारीची मदत होईल. अॅक्सेलच्या व्यापक आंतरराष्ट्रीय अनुभवामुळे जागतिक पातळीवरही लवकरच आमची उपस्थिती वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे. विकास व प्रयोगशीलतेला आम्ही चालना देत राहू आणि जगाच्या प्रवासाच्या शैलीवर भारतातूनच परिणाम करत राहू.”

अप्परकेस आपल्या १०० टक्के उत्पादनांचे डिझाईन व उत्पादन भारतातच करते. बुलेट या तिच्या उत्पादनासाठी प्रतिष्ठेचा रेड डॉट अवार्ड प्राप्त करून तिने नुकताच मैलाचा दगड गाठला आहे. हा सन्मान मिळविणारा तो ६९ वर्षांतील पहिलाच भारतीय लगेज ब्रँड ठरला आहे. ही एक स्मार्ट ड्यूरेबल पर्यावरणस्नेही बॅग असून ती रिसायकल प्लॅस्टिकपासून बनविलेली आहे. पर्यावरणाबद्दल जागरूक असलेल्या ग्राहकांसाठी ती अगदी योग्य आहे. या सन्मानातून नाविन्यता आणि उत्कृष्टतेबद्दल अप्परकेसची निष्ठा प्रतिबिंबित होते.

अॅक्सेलचे भागीदार भारत शंकर सुब्रमण्यन म्हणाले, “आपली सखोल रुजलेली भारतीय ओळख तसेच शाश्वततेबद्दल असलेली अढळनिष्ठा यामुळे अप्परकेस बाजारपेठेत एक स्वतंत्र स्थान निर्माण करत आहे.

या उद्योगातील वीस वर्षांपेक्षा अधिक असलेल्या अनुभवाच्या बळावर सुदीप हे पर्यावरणस्नेही ट्रॅव्हल गिअरमध्ये या ब्रँडच्या विशिष्ट दृष्टिकोनाला दिशा देत आहेत. अप्परकेस हे सर्वांगीण अनुभव पुरवत आहेत, बाजारपेठेतील उभरत्या संधींचा फायदा घेत आहेत, विकास आणि जबाबदार व्यवसाय शैलीसाठी नवीन मापदंड निर्माण करत आहेत. म्हणून त्यांना आधार देताना आम्हाला आनंद होत आहे.”

आपल्या रणनीतीचा एक भाग म्हणून, आघाडीच्या महानगरांमध्ये आपली ऑफलाइन उपस्थिती आणखी वाढवून बाजारपेठेतील स्थिती मजबूत करण्याची अप्परकेसची योजना आहे.

शाश्वततेबद्दल दृढ समर्पणामुळे ब्रँडने कमीत कमी अपव्यय करून आपल्या उत्पादन आणि पुरवठा साखळ्यांद्वारे पर्यावरणास अनुकूल पद्धतींना प्रोत्साहन दिले आहे. त्यातून महत्त्वपूर्ण पर्यावरणीय परिणाम साध्य केला आहे.

सिक्स्थ सेन्स व्हेंचर्स आणि एनमचे आकाश बन्साली या विद्यमान गुंतवणूकदारांनी अप्परकेसच्या प्रवासाला समर्थ आधार दिला आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण आधाराने आणि गुंतवणुकीच्या नवीनतम फेरीसह, अप्परकेस आपल्या वाढीच्या योजनांना गती देण्यासाठी, आपला विस्तार वाढविण्यासाठी तसेच पर्यावरणाला अनुकूल उत्पादने व्यापक ग्राहकवर्गापर्यंत नेण्यासाठी सज्ज झाली आहे.