समितीमध्ये होतेय परिवर्तनशील युवक घडवण्याचे काम

पुणे: “ग्रामीण भागातून पुण्यात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यार्थी साहाय्यक समिती हे दुसरे घरच आहे. माणूसपणाचे शिक्षण, संस्कार देऊन व्यक्तिमत्व घडवण्याचे काम करणारी ही संस्था खऱ्या अर्थाने युवक परिवर्तनाचे केंद्र ठरली आहे. विद्यार्थ्यांतील कलागुण हेरून त्यांच्यात स्फुल्लिंग चेतवण्याचे काम येथे होत आहे,” असे प्रतिपादन लेखक-दिग्दर्शक व अभिनेता योगेश देशपांडे यांनी केले.

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने विद्यार्थी साहाय्यक समितीच्या विद्यार्थी विकास केंद्रातर्फे आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमावेळी योगेश देशपांडे बोलत होते. समितीच्या आपटे वसतिगृहात झालेल्या कार्यक्रमात अभिनेत्री-गायिका अपूर्वा मोडक विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या. समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, विद्यार्थी विकास केंद्राचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, समितीचे विश्वस्त तुकाराम गायकवाड, संजय अमृते, डॉ. ज्योती गोगटे, रत्नाकर मते, विनया ठोंबरे, मनोज गायकवाड, मुख्य विकास अधिकारी चंद्रकांत कुलकर्णी, मुख्य कार्यपालन अधिकारी दुर्गेश पवार यांच्यासह कार्यकर्ते, माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी पर्यवेक्षक आदी उपस्थित होते. लजपतराय विद्यार्थी भवन येथे कार्यकर्त्या सीमा होस्कोटे, तर सुमित्रासदन येथे खजिनदार संजय अमृते यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

योगेश देशपांडे म्हणाले, “ज्या वयात आपल्या व्यक्तित्वाला, करिअरला आकार मिळतो, त्यावेळी चांगले संस्कार, शिकवण खूप गरजेची असते. मीही समितीचा माजी विद्यार्थी असून, येथे मिळालेली शिकवण मला आयुष्यात उपयोगी पडत आहे. स्वच्छता, समता, श्रमप्रतिष्ठा या त्रिसूत्रीवर कार्यरत समितीने हजारो विद्यार्थी घडवले आहेत. आपल्या प्रत्येकात क्षमता असते. ती क्षमता ओळखून तिचे यशस्वी करिअरमध्ये रूपांतर करण्याचे काम समिती परिवारात होत आहे.”

अपूर्वा मोडक म्हणाल्या, “देशाचा उत्तम नागरिक होऊन विकासात योगदान देण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. परस्परांतील बंधुभाव जोपासत, एकमेकांचा आदर करत आपण एकत्रित काम करावे. प्रतिज्ञेत असलेल्या वर्णनाप्रमाणे वागावे. व्यसन व अन्य वाईट सवयींपासून स्वतःला दूर ठेवावे. समिती नेमके हेच येथील विद्यार्थ्यांना शिकवत असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.”

तुषार रंजनकर यांनी प्रास्ताविकात समितीमध्ये राबविण्यात येणारे विविध उपक्रम, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास, उद्योजकतेला कसे प्रोत्साहन दिले जाते, याविषयी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘बिनपैशाचे नाटक’ या मोबाईल व तंत्रज्ञानाच्या अतिवापरावरील पथनाट्याचे, तसेच समूहनृत्याचे पाहुण्यांनी कौतुक केले. अनुष्का राऊत हिने सूत्रसंचालन केले, तर ओंकार शिंदे याने आभार मानले.