महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने बँकॉक येथे झोपेतील पक्षाघाताच्या मागील आध्यात्मिक कारणांविषयीचे संशोधन सादर !
‘झोपेतील पक्षाघातामागील ६० ते ९० टक्के कारणे पूर्णतः आध्यात्मिक स्वरूपाची असतात किंवा आध्यात्मिक आणि मानसिक दोन्ही असतात, म्हणून आध्यात्मिक साधना केल्याने आध्यात्मिक समस्येवर मात करण्यास मदत होते, असे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने केलेल्या आध्यात्मिक संशोधनातून दिसून आले आहे’, असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. नुकतेच बँकॉक, थायलँड येथे झालेल्या ‘टेंथ इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन पब्लिक हेल्थ (ICOPH2024)’ या परिषदेत ते बोलत होते. त्यांनी ‘झोपेतील पक्षाघातावर मात करण्यासाठी आध्यात्मिक उपाय’ हा शोधनिबंध सादर केला. याचे लेखक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले असून, श्री. क्लार्क सहलेखक आहेत.
ऑक्टोबर २०१६ ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने २० राष्ट्रीय आणि ९६ आंतरराष्ट्रीय, अशा एकूण ११६ वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. यांपैकी १४ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्कार मिळाले आहेत.
श्री. शॉन क्लार्क यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या मार्गदर्शनाखाली विविध संस्कृती आणि देश यांतील झोपेतील पक्षाघात अनुभवलेल्या ४६ साधकांवर केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष मांडले. हा प्रकार पौर्णिमा, अमावस्या अन् पितृपक्षात सर्वाधिक आढळला. रात्र असो किंवा सूर्यास्ताच्या जवळील दुपारची वेळ असो, गाढ झोपेच्या वेळी याची वारंवारता जास्त होती. विशेषतः तरुणांना झोपेतील पक्षाघात होतो, याचा सरासरी कालावधी ३ मिनिटे ते ३ तास असतो आणि जेव्हा व्यक्ती तिच्या पाठीवर झोपते तेव्हा या हल्ल्याची शक्यता सर्वाधिक असते, असे या सर्वेक्षणात दिसून आले आहे. अध्यात्मिक संशोधन हे या सर्वेक्षणाच्या निष्कर्षांशी साधर्म्य दाखवते. एका साधारण व्यक्तीसाठी, जेव्हा ती तिच्या पाठीवर झोपते तेव्हा तिच्या कुंडलिनी प्रणालीतील दोन मुख्य सूक्ष्म ऊर्जा वाहिन्या कमीत कमी सक्रिय असतात. यामुळे तिच्या शरीरातील सूक्ष्म ऊर्जेचा प्रवाह (ज्याला प्राणशक्ती असेही म्हणतात) कमी होतो. त्यामुळे सूक्ष्म वाईट शक्तींना व्यक्तीची स्नायू-प्रणाली बंद पाडणे सोपे जाते.
श्री. क्लार्क यांनी पुढे सांगितले की, ८५ टक्के प्रतिसादकर्त्यांनी आध्यात्मिक साधना चालू केल्यानंतर झोपेच्या पक्षाघात होण्याची वारंवारता अनेक पटींनी वाढली; कारण साधना करण्याला सूक्ष्म नकारात्मक शक्तींचा विरोध होतो. याउलट, नियमित आध्यात्मिक उपाय केल्याने ९३ टक्के साधकांना या हल्ल्यांवर मात करण्यास मदत झाली.
समारोप करतांना श्री. क्लार्क यांनी जगभर लागू होणार्या उपायांची माहीती दिली. ते म्हणले की, झोपतील पक्षाघातावर मात करण्यासाठी आणि त्यापासून रक्षण होण्यासाठी, ‘श्री गुरुदेव दत्त’ हा जप नियमित करणे, तसेच अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी जप वाढवणे, पूर्व-पश्चिम दिशेला अन् डाव्या कुशीवर झोपणे आणि पाठ किंवा पोटावर झोपणे टाळणे, तसेच प्रतिदिन १५ मिनिटे मिठाच्या पाण्यात बुडवून उपाय करणे’ यांसारखे उपाय प्रभावी आहेत.