पुणे: भावनिकतेचे मुद्दे उपस्थित करून दिशाभूल करायची. प्रलोभने दाखवून महागाई, बेरोजगारी व शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांसारख्या गंभीर मुद्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. लाडकी बहीण योजना जाहीर करत दीड हजार रुपये देण्याची घोषणा दिशाभूल करणारी आहे. त्यातून सरकार नेमके काय साधतेय, असा सवाल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी केला.
रोहन सुरवसे पाटील म्हणाले, “लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी मोठमोठी आश्वासने दिली होती. मात्र, त्यावर कोणताही ठोस निर्णय न घेता २०१४ च्या निवडणुकीत १५ लाख खात्यावर जमा करण्याचा शब्द दिला, तशाच केवळ घोषणा होताना दिसताहेत. जाहीरनाम्यातील आश्वासने यावेळीही जुमलेबाजीच असल्याचे दिसते आहे. १५ लाख रुपयांचा मुद्दा आता केवळ दीड हजार रुपयांवर आणला असून, जनतेचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे.”
“सत्ताधाऱ्यांकडून भावनिकतेचे मुद्दे उपस्थित करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. भावनिकतेने पोट भरत नाही, तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे. कृषी प्रधान देशातील शेतकरी, नोकरदार, कष्टकरी कामगारांच्या हितासाठी निर्णय कधी घेणार, महागाई आणि बेरोजगारीचा प्रश्न सुटण्याऐवजी जटील बनत आहे. कारखानदारी महाराष्ट्रातून बाहेर नेणार आणि तरुणांच्या हाताला काम देण्याऐवजी बेरोजगार करणार का, युवा पिढीला दिशा दाखवणार की दिशाहीन बनवणार, असे प्रश्न सामान्यांना पडले आहेत. ग्रामीण भागात हाताला काम नाही म्हणून तरुणाई शहराकडे येत आहे, तर शहरातील उद्योगधंदे बंद पडल्याने तेथेही रोजगार मिळत नाही, अशी अवस्था आहे.”