पुणे, जून २०२४ : सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी स्टडीजने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) सोबत सामंजस्य करार केला आहे.
या सामंजस्य करारावर महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ.राजेंद्र पवार आणि सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र – कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार यांनी स्वाक्षरी केली. याप्रसंगी सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. राजेश इंगळे, समन्वयक उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी व स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी स्टडीजचे प्राध्यापक डॉ. महेश वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
हा सामंजस्य करार उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील दरी कमी करणारा आहे.या सामंजस्य करारामुळे एसएसपीयु मधील विद्यार्थ्यांना सुरक्षितता आणि उद्योगातील इतर बाबी समजून घेता येणार आहेत. या करारामुळे विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या संधींचा आणखी एक मार्ग खुला झाला आहे.
याप्रसंगी बोलताना महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ.राजेंद्र पवार म्हणाले की, महावितरणची महाराष्ट्र राज्यात २५ जिल्हा प्रशिक्षण केंद्रे आणि ४ प्रादेशिक केंद्रे आहेत. सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि महावितरण यांच्यातील करार हा दोन्ही संस्थांना परस्पर लाभदायक ठरेल,असेही त्यांनी नमूद केले.
सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एसएसपीयु) प्र – कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या की , हा सामंजस्य करार पदवी कार्यक्रमात उद्योग-संरेखित अभ्यासक्रमाचा समावेश करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. द स्कूल ऑफ सस्टेनेबिलिटी स्टडीज मध्ये स्मार्ट आणि सस्टेनेबल एनर्जी विषयामध्ये 4 वर्षांचा बी.टेक अभ्यासक्रमाचा समावेश आहे. या पदवी अभ्यासक्रमात पर्यावरण आणि शाश्वततेचे सध्याच्या काळातील सर्व कल समाविष्ट आहेत.
डॉ. स्वाती मुजुमदार पुढे म्हणाल्या की, प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि इंटर्नशिप हे शैक्षणिक आणि वास्तविक जग यांच्यातील अंतर कमी करण्याचा एक चांगला मार्ग आहे.इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव मिळविण्याची, कौशल्ये वाढवण्याची आणि करिअरचे मार्ग शोधण्याची संधी मिळणार आहे.अनुभवी तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना निर्णायक दिशा देऊ शकतात आणि विद्यार्थी स्वतःच्या अनोख्या कल्पनांचे योगदान देखील देऊ शकतात. इंटर्नशिप्ससाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नवीन कल्पना आणि दृष्टिकोन निर्माण होतात. विविध पार्श्वभूमीमधून आलेल्या विद्यार्थ्यांना अनुभवातून वेगळ्या वाटेने विचार करून समस्या सोडविण्याचे नवीन मार्ग खुले करू शकतात.