केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे डेव्हलपमेंटल अससेसमेंट स्केल्स फॉर इंडियन इनफंट्स कार्यशाळा संपन्न

पुणे, 11 जून २०२४: केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे नुकतेच बेली स्केलचे भारतीय रूपांतर असलेल्या डेव्हलपमेंटल असेसमेंट स्केल्स फॉर इंडियन इनफंट्स (डीएएसआयआय) या विषयावर सहा दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. बौद्धिक, मानसिक विकासाचे मूल्यांकन करण्यासाठी ही योग्य मूल्यांकन पद्धती असून जन्मापासून ते 30 महिन्यांपर्यंतच्या कालावधीत केली जातेके. ज्या मुलांची मानसिक – शारीरिक वाढ अपेक्षेप्रमाणे होत नाही त्यांसाठी ही मूल्यांकन पद्धती योग्य आहे.

ही बुद्ध्यांक मूल्यांकन पद्धती 1 महिना ते 30 महिने वयोगटातील बाळांच्या विकासात्मक वाढीबाबत माहिती देते. तसेच मानसिक व शारीरिक विकासाच्या विविध पैलूंचे मूल्यांकन करण्यातही मदत करते. यामुळे विकासात्मक समस्यांचे लवकर निदान होऊ शकते व लवकर उपचार सुरु केल्यामुळे विशेष करून बाल अतिदक्षता विभागातून घरी गेलेल्या व उच्च जोखीम असलेल्या नवजात बालकांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्यास मदत होते.

या कार्यशाळेत संपूर्ण भारतभरातील नवजात शिशु तज्ज्ञ,बालरोगतज्ञ, मानसशास्त्रज्ञ सहभागी झाले होते.

या कार्यशाळेत नवजात शिशु तज्ज्ञ,अनुवांशिक तज्ञ, ईएनटी तज्ञ आणि पीडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन यांसारख्या विविध तज्ञांची व्याख्याने आणि प्रात्यक्षिके यांचा समावेश होता. मानसशास्त्रज्ञ, ऑक्युपेशनल थेरपिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट यांनी या चाचणीबाबत प्रात्यक्षिकां द्वारे मार्गदर्शन केले.

केईएम हॉस्पिटल पुणे मधील वरिष्ठ बालरोग तज्ञ डॉ.सुधा चौधरी म्हणाल्या की, गेल्या 13 वर्षांपासून ही कार्यशाळा आयोजित करणारे केईएम हॉस्पिटल पुणे हे भारतातील एकमेव केंद्र आहे.

या कार्यशाळेमुळे सहभागींना आपल्या संबंधित केंद्रांमध्ये बालकांच्या विकासात्मक समस्यांचे लवकर निदान आणि लवकर उपचार करण्यास मदत होईल.  

जगताप कुटुंबाचे शैक्षणिक, सहकारातील काम आदर्शवत :- अशोकराव मोहोळ 

सासवडमध्ये स्व चंदूकाका जगताप यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छ सुंदर माझी शाळांचे बक्षिस वितरण…. 

सासवड :- 

पुरंदर ही शुरांची आणि संतांची भूमी असून या भूमीत दिवंगत लोकनेते चंदूकाका जगताप व त्यांच्या कुटुंबीयांनी आदर्श शैक्षणिक आणि सहकार संस्था उभ्या करून सक्षमपणे चालविल्या, मोठ्या केल्या. त्यामुळे येथील दुर्गम डोंगरी भागातील सर्वसामान्य शेतकरी, कष्टक-यांची मुल शिकली. चंदूकाकांचा स्वभाव स्पष्ट आणि काम स्वच्छ होते आणि त्यांचा वारसा जपणाचे काम त्यांचे कुटुंबीय करीत आहेत असे गौरवोद्गार माजी खासदार अशोकआण्णा मोहोळ यांनी सासवड येथे काढले. 

सासवड येथे मंगळवारी ( दि ११ ) शिक्षणमहर्षी स्व चंदूकाका जगताप यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त संत सोपानकाका सहकारी बँकेच्या वतीने पुरंदर – हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून संत सोपानकाका सहकारी बँक आणि श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवड यांनी पुणे विभागातील सुमारे ३ हजार माध्यमिक विद्यालयांत राबविलेल्या ” संत सोपानकाका सुंदर माझी शाळा ” अभियानाचा बक्षिसवितरण समारंभ माजी खासदार अशोकआण्णा मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली, सनदी अधिकारी व पुणे दक्षिण कमानचे प्रधान निदेशक डॉ राजेंद्रबापू जगताप, पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते आणि पुरंदर हवेलीचे आमदार आ संजय जगताप यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

पुणे जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ भाऊसाहेब कारेकर, मुख्याध्यापक महामंडळाचे माजी अध्यक्ष सुभाष माने, प्रकाश पवार, मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे के पाटील, पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सतिश उरसळ यांनी आमदार संजय जगताप यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. ही योजना राबविल्याबद्दल कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षक संघटनेच्या वतीने आमदार संजय जगताप यांचा सत्कार करण्यात आला. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा आनंदीकाकी जगताप, संत सोपानकाका सहकारी बँकेचे अध्यक्ष रमणिकलाल कोठडिया, संचालिका राजवर्धिनी जगताप, सविता ताकवले आदी उपस्थित होते. 

याप्रसंगी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी, मुलांच्या आयुष्याचा पाया घडविणारी शाळा स्वच्छ सुंदर असलीच पाहिजे.,शाळेतील गुणवत्तेला महत्त्व आहे. शिक्षकांनी नेहमी काळानुरूप बदलत राहिले पाहिजे. मुलांच्या बौद्धिक विकासाबरोबर मानसिक विकास झाला पाहिजे असे सांगितले. मराठी माध्यमाच्या शाळांना चांगल्या इमारतींसह सर्व शैक्षणिक भौतिक सुविधांची उपलब्धता असणे आवश्यक आहे. विद्यालयत शिस्त, सर्व समितीच्या असणे महत्वाचे असून विद्यार्थ्यांना शासनाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात येतो का हे पाहणे गरजेचे आहे. संच मान्यता, रिक्त असलेल्या हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणे अत्यावश्यक असून ती संधी न घालवता पुर्वीप्रमाणे वेतन श्रेणीने भरणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. 

पुरस्कार समितीचे प्रमुख प्राचार्य नंदकुमार सागर यांनी प्रास्ताविकातून पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली.  यावेळी नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, प्रदीप पोमण, नंदकुमार जगताप, संजय ग जगताप, मानसिंग चव्हाण, सचिन दुर्गाडे, कृष्णा शेट्टी, अंकुशराव जगताप, दत्तात्रय गवळी, कानिफनाथ आमराळे, सुहास लांडगे, संतोष खोपडे, राहूल पवार, दत्तात्रय पाटील, शिवाजीराव कामथे, अरूण थोरात, आदीनाथ थोरात, शिवाजीराव किलकिले, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुरेश खोपडे, तुकाराम बेनके, सुनिता कोलते, समरादित्य जगताप, चेतन महाजन, प्रसाद गायकवाड यांसह विविध तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. समितीचे कुंडलिक मेमाणे, सुधाकर जगदाळे, अनिल उरवणे, दिलीप साबणे, रवींद्रपंत जगताप, विश्वजीत आनंदे, चंद्रशेखर जगताप, सतिश शिंदे आदींनी नियोजन केले.याप्रसंगी पुणे विभागातील अनेक शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. वसंतराव ताकवले आणि दत्तात्रय रोकडे यांनी सुत्रसंचलन केले तर रामप्रभू पेटकर यांनी आभार मानले. 

चौकट….. 

याप्रसंगी बोलताना मोहोळ यांनी, आमदार संजय जगताप यांच्या “स्वच्छ सुंदर शाळा” या उपक्रमाचा आदर्श महाराष्ट्र शासनाने घेतला असून शासनाने सुंदर शिक्षण द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करीत शासनाच्या शैक्षणिक धोरण, शिक्षक भरती प्रक्रिया याबद्दल नाराजी व्यक्त करीत मंत्री आणि सचिव बदलले की शैक्षणिक धोरण बदलते….. मुलांचा विचार कोण करणार आहे का असा प्रश्नही माजी खासदार अशोकआण्णा मोहोळ यांनी उपस्थित केला. 

चौकट…. शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणारा आमदार 

यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी, आमदार संजय जगताप यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. इंग्रजी माध्यमाच्या शाळांत त्यांनी आॅनलाईन पद्धतीने नवीन तंत्रज्ञानाच्या शिक्षणाला सुरुवात केली असून पुण्याहून सासवडला मुल शिक्षणासाठी येत आहेत. आमदार  संजय जगताप यांचे शिक्षणाबरोबर सहकारातही चांगले काम असून स्व चंदूकाका जगताप यांचे विचार, वारसा ते पुढे घेऊन जात आहेत. महाराष्ट्रातील शाळा स्वच्छ सुंदर झाल्या पाहिजेत असा आ जगताप यांचा मानस असून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारे विधानसभेतील एकमेव आमदार संजय जगताप आहेत असेही आ आसगावकर म्हणाले. 

चौकट…. शिक्षकांच्या बदल्या नको.. 

परीसर किती मोठा आहे यापेक्षा तो किती स्वच्छ आहे हे चंदूकाका जगताप त्या त्या संस्थांत पहायचे. हाच उद्देश समोर ठेऊन ही संकल्पना पुढे आली. शिक्षकांच्या बदल्या नको… त्यामुळे आत्मियता राहणार नाही. मी माझ्या संस्थेत हे तत्व मी पाळतो त्यामुळे निकाल, गुणवत्ता चांगली आहे.