आई व परिचारिकांचे कार्य अतुलनीय, अमूल्य : सुषमा चोरडिया

पुणे : “आई आणि परिचारिका दोघीही सेवा व समर्पणाचे प्रतीक आहे. मूल घडवण्यात आईचे व रुग्णसेवेत परिचारिकेचे योगदान अमूल्य आहे. कुटुंबाची व रुग्णाची सेवा दोघीही तन्मयतेने करतात. या दोघींचे अस्तित्व प्रत्येकाच्या मनात सर्वोच्च स्थानी आहे. त्यांच्या कार्याची तुलना अथवा गुणांकन होऊ शकत नाही. त्यांचे कार्य अतुलनीय व अमूल्य आहे,”  असे प्रतिपादन सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व सूर्यदत्त वुमेन्स आंत्रप्रेन्युअरशीप लीडरशीप अकॅडमीच्या अध्यक्षा सुषमा चोरडिया यांनी व्यक्त केले. काळजी, सेवा, प्रेम आणि निःस्वार्थ मदत करण्याच्या वृत्तीमुळेच आई आणि परिचारिकेचे समर्पण आणि वचनबद्धता स्पष्टपणे दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या वतीने आंतरराष्ट्रीय मातृदिन आणि परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षी १२ मे रोजी हे दोन्ही दिवस जगभर साजरे करण्यात येतात. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. फ्लोरेन्स नायटिंगल यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
बावधन येथील ‘सूर्यदत्त’च्या कॅम्पसमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नर्सिंग महाविद्यालयांना सल्लागार म्हणून कार्यरत एस. ऋषिकेश, ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, कार्यकारी विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, मुख्य कार्यपालन अधिकारी अक्षित कुशल, प्रशांत पितालिया, शीतल फडके, रोहित संचेती, प्राचार्य डॉ. सिमी रेठरेकर, प्राचार्य सायली पांड्ये, प्राचार्य हेमंत जैन, सविता मटाने, नयना गोडांबे, रोशनी जैन, मारुती मारेकरी, बाटु पाटील, नेत्रा देशपांडे आदी उपस्थित होते. प्रशांत पितालिया यांनी प्रस्तावना केली. प्राचार्य डॉ. सिमी रेठरेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. स्नेहल नवलखा यांनी आभार मानले.
एस. ऋषिकेश म्हणाले, “रुग्णसेवेसाठी अहोरात्र झटणाऱ्या जगातील प्रत्येक परिचारिकेचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे. आधुनिक नर्सिंगच्या संस्थापिका लेडी फ्लोरेन्स नायटिंगल यांचा जन्मदिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा साजरा केला जातो. धनाढ्य कुटुंबात वाढूनही फ्लोरेन्स नाईटिंगेल यांनी आपले जीवन रुग्णसेवेसाठीसमर्पित केले. आधुनिक सुश्रुषा पद्धती विकसित केल्या. नर्सिंग क्षेत्राला प्रतिष्ठा मिळवून दिली. आई आपल्याला घडवते. मातृदिनाच्या निमित्ताने आईप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. हे दोन्ही दिवस एकत्र येणे हा दुग्धशर्करा योग आहे.”