आनंद नोंदवण्यापेक्षा अनुभवा; बेभान होण्याऐवजी तल्लीन व्हा!

पुणे : “आभासी जगात एकमेकांकडे बघून बोलण्याचे प्रमाण कमी झाले. संवादातील भावना हरवत चालली आहे. आनंद अनुभवण्यापेक्षा तो नोंदवण्यावर, तसेच एखाद्या कलाकृतीत तल्लीन होण्याऐवजी बेभान होण्याकडे आपला अधिक कल असतो. तणावमुक्त, मनःशांतीचे जीवन जगण्यासाठी बेभान न होता तल्लीन होऊन आनंदानुभूती घ्यावी,” असे प्रतिपादन प्रसिद्ध दिग्दर्शक, संगीतकार आणि गायक डॉ. सलील कुलकर्णी यांनी केले.
समवेदना संस्थेच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. कुलकर्णी यांच्या ‘मना तुझे मनोगत’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. सलील कुलकर्णी यांनी पालकत्व, मुलांशी संवाद, नातेसंबंध व कथाकथन अशा विविध विषयांवर गप्पा, संगीत, गाणी व कवितांच्या माध्यमातून त्यांच्या अनोख्या शैलीत मनमोकळ्या गप्पा मारल्या. श्रद्धा कुलकर्णी यांनी डॉ. कुलकर्णी यांची दिलखुलास मुलाखत घेतली.
मयूर कॉलनीतील एमईएस बालशिक्षण सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ होते. प्रसंगी ‘समवेदना’चे संस्थापक डॉ. चारुदत्त आपटे, विश्वस्त प्रकाश तुळपुळे, सल्लागार राजीव साबडे, ज्येष्ठ सदस्य बापू पोतदार, मुख्य व्यवस्थापक अमर पवार आदी उपस्थित होते. देणगीदार व हितचिंतकांप्रती कृतज्ञतेच्या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
डॉ. सलील कुलकर्णी म्हणाले, “संवादात भावनेला, सहजतेला खूप महत्व आहे. आजी-आजोबांकडून, आई-वडिलांकडून नकळतपणे सांगितलेल्या गोष्टीतून संस्कार होतात. ‘एकदा काय झालं’ ही कलाकृती अनुभव संपन्न करणारी आहे.अनुभवी लोकांनी पुढच्या पिढीतील लोकांना चांगल्या गोष्टी सांगायला हव्यात. नातवंडांना, मुलांना सांगायला हवे. आधीच्या पिढीने भान सांभाळले पाहिजे. तर्क सांगितले पाहिजेत. दोन पिढ्यांमधील दोन माणसांचे नाते ओघवते, सहज व आत्मीयतेचे असावे.”
अमर पवार यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आरोग्य क्षेत्रात कार्यरत समवेदना संस्था उपचार, प्रतिबंध आणि प्रसार या त्रिसूत्रीवर आधारित उपक्रम राबविते. गरीब रुग्णांना आर्थिक मदत, शालेय आरोग्य व महिलांसाठी कॅन्सर उपक्रमासोबत मानसिक स्वास्थ्याचा विषयही हाती घेतला आहे. यंदा समवेदना उपक्रमांचा २०,००० हून अधिक शहरी व ग्रामीण व्यक्तीनी लाभ घेतला. यामध्ये १२००० पेक्षा अधिक शालेयवयीन मुलांचा समावेश आहे. या मुलांसोबत काम करताना त्यांच्या सामाजिक आणि मानसिक समस्या समोर येत आहेत. त्यावर संस्थेने काम सुरु केल्याचे अमर पवार यांनी नमुद केले.
डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनीही मनोगत व्यक्त करत समवेदना संस्थेच्या कार्याचा गौरव केला. आरोग्य सेवेत सरकारी यंत्रणा अपुरी पडते. अशावेळी समवेदना संस्थेचे कार्य अतिशय महत्त्वाचे आहे, असे त्यांनी नमूद केले. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले. शरयू जावळे यांनी आभार मानले.