पुणे : सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित सूर्यदत्त इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायबर सिक्युरिटीच्या बीएस्सी इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल सायन्सचा निकाल सलग दुसऱ्या वर्षी १०० टक्के लागला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील किंबहुना भारतातील पहिलाच अभ्यासक्रम असलेल्या बीएस्सी इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल सायन्समधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
एप्रिल २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या वार्षिक परीक्षेला तृतीय वर्षातील ३७ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १४ विद्यार्थ्यांना ‘ए प्लस’, तर २२ विद्यार्थ्यांना ‘ए’ श्रेणी मिळाली आहे. कुणाल निलेश गावंडे (८६.०५ टक्के), कपिल श्रीपाद कुलकर्णी (८२.१६ टक्के), तर स्वरूप रवींद्र देशपांडे (८१.१८ टक्के) यांनी ‘ए प्लस’ श्रेणीसह अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे व प्राचार्य डॉ. अरिफ शेख यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल सायन्समध्ये बीएस्सी या उदयोन्मुख शाखेतील दुसऱ्या तुकडीतून सलग दुसऱ्या वर्षी सायबर सिक्युरिटी विषयाचे ३७ विद्यार्थी ‘सूर्यदत्त’ संस्थेतून उत्तीर्ण झाले. भारतासह संपूर्ण जगातून सायबर सिक्युरिटी विषयातील तज्ज्ञाची गरज स्पष्ट होत असताना सूर्यदत्त ही गरज पूर्ण करण्याचा यशस्वी प्रयत्न करत आहे, याचा आनंद वाटतो. नुकत्याच घेण्यात आलेलया ‘सायबेक्स कॉनक्लेव’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. देशभरातून आलेल्या सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल सायन्स क्षेत्रातील तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. आधुनिक जगातील गरजांना ओळखून युवा पिढीला सक्षम करण्याचा प्रयत्न सूर्यदत्त सातत्याने करत आहे.”