जन्मजात हृदयरोग असलेल्या, मुदतपूर्व जन्मलेल्या व कमी वजनाच्या बाळावर यशस्वी बलून एओर्टोप्लास्टी प्रक्रिया

पुणे, मे 2024 : नोबल हॉस्पिटल्स अँड रिसर्च सेंटरमधील डॉक्टरांच्या बहुविभागीय टीमने नुकतेच  शरीराच्या खालच्या अर्ध्या भागाला पुरवठा करणार्‍या प्रमुख रक्तवाहिनीत अडथळा असलेल्या कमी वजनाच्या मुदतपूर्व जन्मलेल्या बाळावर यशस्वीरित्या बलून एओर्टोप्लास्टी प्रक्रिया केली.या बाळाला कोअ‍ॅर्कटेशन ऑफ एर्ओटा (हृदयातून शरीराला रक्तपुरवठा करणार्‍या डाव्या कप्प्यातील प्रमुख रक्तवाहिनीमध्ये अडथळा) या स्थितीचे निदान झाले होते. या जीवनदायी प्रक्रियेमुळे आणि 20 दिवसांच्या अतिदक्षता विभागातील देखभालीनंतर आता बाळ सुखरूप घरी गेले आहे.

याबाबत माहिती देताना नवजात शिशु तज्ज्ञ (निओनेटोलॉजिस्ट) व एनआयसीयू मधील अ‍ॅकेडेमिक्स विभागाचे प्रमुख डॉ.अनिल खामकर म्हणाले की,नजिकच्या एका रूग्णालयातून 1500 ग्रॅम अशा कमी वजनाच्या व मुदतपूर्व जन्मलेेल्या बाळाला जन्मानंतर दोन तासांतच आमच्या रूग्णालयात घेऊन येण्यात आले. आईच्या पोटात असताना या बाळाच्या हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता असल्याने सिझेरियन सेक्शन करण्यात आले व प्रसूती साडेसात महिन्यात (32.5 आठवड्यात) झाली होती. रूग्णालयात दाखल झाल्यानंतर बाळाची परिस्थिती अस्थिर होती. श्‍वसनाचा त्रास होत होता. प्राणवायू आणि रक्तदाबाची पातळी कमी झाली होती. 2डी इको द्वारे कोअ‍ॅर्कटेशन ऑफ एर्ओटा या स्थितीचे निदान झाले. ही स्थिती असलेले लहान बाळ काही दिवस स्थिर असते,कारण पेटंट डक्टस आर्टेरिओसस (पीडीए) च्या द्वारे रक्ताभिसरणाला पर्यायी मार्ग मिळतो.

(डक्टस आर्टेरियोसस (डीए) ही एक एर्ओटा आणि फुफ्फुसातील रक्तवाहिन्यांना जोडणारी गर्भाची वाहिनी असते.) डक्टसमुळे जन्माच्या आधी ही वाहिनी रक्ताला फुफ्फुसापासून दूर नेते. प्रत्येक बाळ हे डक्टस आर्टेरिओसससह जन्मते. जन्मानंतर याची गरज नसल्यामुळे पहिल्या काही दिवसात अरूंद होेऊन बंद होते.

नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील वरिष्ठ बालहृदयरोग तज्ञ डॉ.प्रभातकुमार म्हणाले की,पीडीए 10 दिवसांनी अरूंद झाल्याने बाळाला श्‍वसनाचा त्रास व्हायला लागला आणि हृदयाचे कार्य बंद पडू लागले. बाळाला वाचविण्यासाठी अरूंद झालेल्या एर्ओटामध्ये बलून डायलेटेशन (फुगा टाकून फुगविणे) ही प्रक्रिया करून रक्तप्रवाह पूर्ववत करणे हा एकमेव मार्ग होता.12व्या दिवशी आमच्या कार्डियाक कॅथलॅबमध्ये बलून डायलेटेशन ऑफ कोअ‍ॅर्कटेशन ही प्रक्रिया करण्यात आली. या प्रक्रियेमध्ये रक्तवाहिनीत अरूंद झालेल्या भागात एक फुगा टाकण्यात येतो.नंतर तो फुगा हळूहळू फुगवत अरूंद झालेली वाहिनी मोठी करण्यात येतेे.

या प्रक्रियेमध्ये भूलतज्ञ डॉ.निलेश वसमतकर आणि त्यांची टीम तसेच निओनॅटोलॉजी फेलो डॉ.रोहित बोरकर यांचे सहकार्य लाभले.

नवजात शिशु तज्ज्ञ (निओनेटोलॉजिस्ट) व एनआयसीयू मधील अ‍ॅकेडेमिक्स विभागाचे प्रमुख डॉ.अनिल खामकर म्हणाले की,1500 ग्रॅम इतक्या कमी वजनाच्या बाळावर अशी प्रक्रिया करणे अतिशय दुर्मिळ असून यामध्ये कुशलता,अनुभव आणि सांघिक कार्य अत्यंत महत्त्वाचे असते.या प्रक्रियेला सुमारे दोन तास कालावधी लागला.ही प्रक्रिया यशस्वी झाली आहे की नाही हे शोधण्यासाठी 2डी इको ही मानक चाचणी मानली जाते आणि त्यामध्ये रक्तवाहिनी यशस्वीरित्या खुली होऊन रक्तप्रवाह सामान्य झाल्याचे दिसून आले.

पेडियाट्रिक्स विभागाचे प्रमुख डॉ.पी.डी.पोटे म्हणाले की,अशा कमी वजनाच्या आणि आजारी असलेल्या बाळांसाठी आमच्या एनआयसीयू टीमतर्फे सर्वसमावेशक उपचार प्रदान केले जातात. या क्षेत्रातील तज्ञ सल्लागार आमच्या टीममध्ये समाविष्ट असून या टीममध्ये डॉ.अभय महिंद्रे,डॉ.अनिल खामकर,डॉ.सुमित भावसार यांचा समावेश असून डॉ.संतोष,डॉ.सुजाता,डॉ.रोहित,डॉ.संगीता,डॉ.स्मिता यांसह परिचारिकांचा खंबीर पाठिंबा असतो.

 नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे कार्यकारी संचालक डॉ.एच.के.साळे म्हणाले की, या यशस्वी कामगिरीतून अशा प्रकारच्या आव्हानात्मक स्थितीमध्ये महत्वाच्या असलेले बहुविभागीय टीमचे प्रयत्न आणि समन्वय प्रतिबिंबित होतो.

नोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने म्हणाले की, किफायतशीर दरात प्रत्येकाला उत्कृष्ट दर्जाची एकात्मिक आरोग्य सेवा प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे