नुकत्याच नवीन तरुणाची भेट झालीये थांबा! तुम्ही हि चूक करू नका

एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच पुण्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणीचं अपहरण करून तिची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नुकतीच ओळख झालेल्या तरुणाने तिची हत्या केल्याने पुणेकर चांगलेच हादरून गेले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा कुणाच्या तरी मध्यस्थीने ओळख झाली असेल तर वेळीच सावध व्हा. ही ओळख तुमच्या जीवावर उठू शकते. तुम्हाला आयुष्यातून उठवू शकते. तुमच्या घरच्यांना नाहक त्रास देणारी ठरू शकते. तुमची एक चूक सर्वांसाठी कशी महागात पडू शकते हे तुम्हालाही कळणार नाही. पुण्यात एका तरुणीची एका तरुणासोबत नुकतीच ओळख झाली. केवळ तोंडओळख असतानाही ही तरुणी त्याला भेटायला गेली अन् पुढे जे घडलं त्याने शांत, संयमी पुणेकर हादरले. सध्या ही घटना पुण्यात चर्चेचा विषय झाली आहे.

पुण्यातील एका अभियांत्रिकी कॉलेजमध्ये शिक्षण घेत असणारी तरुणी नुकतीच ओळख झालेल्या आपल्या मित्राला भेटायला गेली होती. पण ही तरुणी मॉलमध्ये गेली आणि आपला जीव गमावून बसली. या तरुणीला भेटायला आलेल्या तिच्या मित्राने तिचं त्याच मॉल परिसरातून काही साथीदारांसह अपहरण केलं. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांकडे 9 लाख रुपयांची खंडणी मागितली. खंडणी दिली नाही म्हणून या तीन नराधमांनी त्या तरुणीचा गळा दाबून खून केला.

शेतात मृतदेह जाळला

या तरुणीचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या तरुणांनी नगरजवळील एका शेतात तिचा मृतदेह जाळला. त्यानंतर या तरुणीचा जळालेला मृतदेह एका खड्यात पुरला. ही घटना उघड झाल्यानंतर संपूर्ण पुणे हादरून गेलंय. पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळालं आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून अधिक तपास करत आहेत.

आईला म्हणाली…

या तरुणीने घरातून निघताना मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असल्याचं आईला सांगितलं होतं. आईचं आणि तिचं हे शेवटचं बोलणं होतं. त्यानंतर ती घरी आली नाही म्हणून तिच्या कुटुंबीयांनी तक्रार केल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितलं. कोणतीही ओळख नसतान नुकतीच ओळख झालेल्या मित्राला भेटायला जाणं या तरुणीच्या जीवावर बेतलं. त्यामुळे पुण्यात घबराट पसरली आहे.

पोलीस काय म्हणाले?

या प्रकरणी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी माहिती दिली. गावाकडचा असल्याचं सांगून या मुलाने तिला बोलावलं होतं. त्यानंतर गाडीतच तिची हत्या केली. नंतर तिच्या कुटुंबीयांकडे त्यांनी खंडणीची मागणी केली होती, असं मनोज पाटील यांनी सांगितलं. विमानतळ परिसरात ही घटना घडली. 1 तारखेला अपहरणाची माहिती मिळाली. 2 तारखेला या मुलीच्या आईच्या फोनवर फोन आला आणि त्यांच्याकडे काही रक्कमची मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे ज्या दिवशी अपहरण केलं त्याच दिवशी त्यांनी हत्या केली होती. नंतर खंडणी मागण्यात आली आहे. तपासात खंडणीसाठीच खून झाल्याचं तपासात निष्पन्न झालं, असं पाटील म्हणाले.

दोघेही एकाच कॉलेजात शिकणारे होते. एकाच भागात राहणारे होते. त्यांचा परिचय होता. गावाकडचा आहे म्हणून त्याने या मुलीशी ओळख केली आणि तिला बोलावून हत्या केली. या प्रकरणी तिच्या वर्गात शिकणाऱ्या शिवमला अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. त्यातील एक तिच्या वर्गात शिकतो. दुसरा डिप्लोमा करतो तर तिसरा इयत्ता बारावीत आहे, असं पाटील यांनी स्पष्ट केलं.