संभाजीनगर : मानलेल्या भावाच्या सांगण्यावरुन उसने पैसे घेण्यासाठी गेलेल्या विविहितेवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी पिडितेच्या अंगावरील दागिने आणि मोबाईल हिसकावून पसार झाले. ही घटना ५ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता केम्ब्रिज चौकजवळील सूर्या लॉन्सच्या बाजुला असलेल्या झाडीत घडली. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकनाथ नामदेव केदारे (वय २५, रा. आडगाव) आणि अन्य दोघांचा आरोपींमध्ये समावेश आहे. यातील एकनाथ केदारेला अटक केली आहे, असे पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांनी सांगितले.
अधिक माहितीनुसार, ३५ वर्षीय पीडितेने २२ वर्षीय मानलेल्या भावाकडे उसने पैसे मागितले होते. ५ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता मुलांना नूडल्स आणण्यासाठी ती पतीसह दुचाकीने गेली होती. यावेळी मानलेल्या भावाने एकनाथ नावाचा मित्र येऊन तुला २ हजार रुपये देईल, असे सांगितले. अंदाजे १० मिनिटांनी दुचाकीवरून एकनाथ आला. त्याने केम्ब्रिज चौकात एक मित्र उभा असून त्याच्याकडे पैसे आहेत, तेथून पैसे घेऊन तुम्हाला देतो, असे सांगून पीडितेला दुचाकीवर बसवून केम्ब्रिज चौकात नेले.
केम्ब्रिज चौकाजवळील हॉटेल सूर्यासमोर पोचल्यानंतर पाच मिनिटे थांबल्यावर पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवर दोन अनोळखी इसम आले. एकनाथला बाजुला घेऊन ते तिघे काहीतरी बोलले. त्यावर तिघांनी अचानक पीडितेला मारहाण सुरु केली. तिने आरडाओरड करू नये म्हणून तोंड दाबून धरले. तिला ओढत हॉटेलच्या पाठीमागील झाडीत नेले. तिकडे तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.
तिन्ही आरोपींनी पीडितेच्या अंगावरील चार ग्रॅमचे मंगळसूत्र आणि तिचा मोबाइल हिसकावून नेला. धक्कादायक म्हणजे, पीडितेला त्याच अवस्थेत तेथे सोडून ते पसार झाले. पिडीताने आपली सुटका करुन घरी पोहोचली. त्यानंतर तीने पतीला सर्व घटनाक्रम सांगितला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात धाव घेतली. पिंग पथकाच्या सहायक निरीक्षक निशा बनसोड यांनी पीडितेचा जबाब नोंदविला. त्यावरून सामूहिक अत्याचार, लुटमारीचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास सहायक निरीक्षक मनीषा हिवराळे करीत आहेत.