दोन व्यक्तींच्या अंतर्गत वादातून गोळीबार; हातातील बंदूक ताणून दोन राऊंड फायर

मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली आहे. मुंबई पोलिस तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून या गोळीबारासंदर्भात तपास सुरू आहे. अंतर्गत वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मुंबईतील सायन कोळीवाडा परिसरात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मुंबई पोलिस तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडून या गोळीबारासंदर्भात तपास सुरू आहे. शनिवारी पहाटे पाच वाजता हा गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे.

पहाटे दार ठोठावलं, उघडताच ठो ठो ..

सायन कोळीवाडा परिसरातील एका घरात पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दोन व्यक्तींच्या अंतर्गत वादातून हा गोळीबार घडल्याचे समोर आले आहे. आकाश स्वामी असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून विवेक चेत्तियार असे गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नावं आहे. आकाश स्वामी हा सायन कोळीवाडा परिसरातील एका चर्चच्या बाजूच्या परिसरामध्ये एकटाच घरात रहात होता. आज (शनिवार) पहाटे पाचच्या सुमारास आरोपी विवेक आकाशच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला.

आकाशने दरवाजा उघडताच आरोपी विवेकने त्याच्या हातातील बंदूक ताणून आकाशवर दोन राऊंड फायर केले, अशी माहिती समोर आली आहे. आरोपीने आकाश स्वामीच्या पोटात गोळी झाडल्याच समोर आलं आहे. गोळी लागल्यामुळे आकाश गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावरती सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दारू पिताना झालेल्या वादामुळे केला गोळीबार

आरोपी विवेक आणि गोळीबारात जखमी झालेला आकाश या दोघांमध्ये दारू पिताना काही वाद झाला होता. आणि त्याच वादातून हा गोळीबार झाल्याची माहिती मिळत आहे. जखमी आकाश स्वामीवर 2017 साली हत्येचा प्रयत्न केल्याचा एक गुन्हा दाखल आहे. तर त्याच्यावर गोळीबार करणारा आरोपी विवेक चेत्तियरवर आधीच 7 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती समोर आहे. अँटॉप हिल पोलिसांनी याप्रकरणी तपासाला सुरूवात केली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांकडूनही या प्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.

यापूर्वीही गोळीबाराने हादरलं राज्य

गेल्या काही महिन्यांत राज्यात तसेच गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत. नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच कुख्यात गुंड शरद मोहोळची हत्या झाल्यानं पुणं हादरलं. 5 जानेवारी ला गोळ्या झाडून शरद मोहोळची हत्या झाली. त्याच्याच टोळीतील काही तरूणांनी त्याच्यावर भरदुपारी गोळ्या झाडल्या आणि त्याला संपवलं, यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती.

तर त्यानंतर काहीच दिवसांनी फेब्रुवारी महिन्यात उल्हासनगरमध्ये चक्क पोलीस स्टेशनमध्येच भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. गायकवाड यांनी केलेल्या गोळीबारामध्ये शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि राहुल पाटील हे दोघेही गंभीर जखमी झाले होते.

तर त्यानंतर अवघ्या काहीच दिवसांत ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या गोळीबाराने दहिसर हादरलं. दहीसरमधील ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. आरोपी मॉरिस भाई याने घोसाळकर यांना त्याच्या कार्यालयात बोलावून फेसबूक लाईव्ह दरम्यानच त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्याने स्वत:वर चार गोळ्या झाडून घेतल्या. त्यामुळे त्याचाही मृत्यू झाला.

गेल्या काही महिन्यात राज्यात घडलेल्या या घटनांमुळे एकच खळबळ माजली आहे.