पुणे : “देशातील सर्वाधिक प्रवासी वाहतूक सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांद्वारे होते. पायाभूत सुविधा, चांगले रस्ते, तंत्रज्ञानाचा अंतर्भाव, वाहतूक जनजागृती, कायद्याची कठोर अंमलबजावणी यातून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम व सुरक्षित करण्यावर भर दिला जात आहे. या प्रयत्नाला ‘प्रवास ४.०’सारखे कार्यक्रम पूरक आहेत,” असे प्रतिपादन सहपरिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी केले.
बस अँड कार ओनर्स कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया (बीओसीआय), पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशन आणि पिंपरी-चिंचवड बस अँड कार ओनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारतातील सर्वात मोठे वाहतूक प्रदर्शन असलेल्या ‘प्रवास ४.०’च्या माहिती पुस्तिकेचे अनावरण, तसेच वाहतूक सुरक्षा जनजागृतीपर ध्वनिचित्रफितीचे लोकार्पण करण्यात आले. ‘प्रवास ४.०’ हे महाप्रदर्शन यंदा २९ ते ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत बंगळुरू येथे होणार आहे.
बालेवाडी येथील हॉटेल ऑर्चिड येथे झालेल्या या कार्यक्रमात बीव्हीजी ग्रुपचे संस्थापक हनुमंतराव गायकवाड, अभिनेता देवदत्त नागे, सहायक परिवहन अधिकारी सुरेश आव्हाड, पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे, ‘बीओसीआय’चे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, चेअरमन जगदेव सिंह खालसा, महासचिव अल्लाह बक्ष अफजल, खजिनदार हर्ष कोटक, पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजन जुनवणे, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे, संयोजक किरण देसाई, तुषार जगताप, बालकलाकार हर्षित देसाई यांच्यासह पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पुणे बस अँड कार ओनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली.
जितेंद्र पाटील म्हणाले की, महामार्ग मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. परिणामी वाहनांचा वेगही वाढला आहे. त्यातून होणाऱ्या अपघातांना रोखण्याचे आव्हान आहे. खासगी वाहनांची संख्या वाढत असताना सार्वजनिक वाहतुकीवर अधिक भर दिला, तर वाहतूक कोंडी, प्रदूषण यावरही नियंत्रण आणता येईल. त्यादृष्टीने धोरणात्मक निर्णय घेऊन येत्या काळात सार्वजनिक वाहतुकीला सक्षम करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहेत. स्मार्ट पोलिसिंग, आयटीएमएस प्रणाली अमलात आणली जात आहे.”
प्रसन्न पटवर्धन म्हणाले, “देशातील सर्वाधिक ८० टक्के प्रवासी वाहतूक सेवा देणारे आपले क्षेत्र आहे. जगभर बदल होताहेत, तंत्रज्ञान अंतर्भूत होत आहे. त्यामुळे येत्या काळात सार्वजनिक वाहतुकीला चांगले दिवस येतील असा विश्वास वाटतो. सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन, कर सवलत, चांगल्या पायाभूत सुविधा व दर्जा देण्याची आवश्यकता आहे. खासगी बस वाहतूक सेवेकडून लोकांना अनेक अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी आपण सुरक्षेच्या बाबतीत तडजोड न करता उत्तम सेवा द्यावी.”
हनुमंतराव गायकवाड म्हणाले, “कोणत्याही क्षेत्रात चांगली व सुरक्षित सेवा दिली, तर ग्राहक नेहमीच समाधानी असतो. सुरक्षित प्रवासाला लोकांचे प्राधान्य असते. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक जितकी सुरक्षित व आरामदायी होईल, तितका चांगला प्रतिसाद प्रवासी देतील. वाहतूकदारानी नावीन्यतेचा, तंत्रज्ञानाचा अंतर्भाव करून चांगली सेवा देण्यावर भर दिला पाहिजे.”
देवदत्त नागे म्हणाले, “रस्ते सुरक्षेचा मुद्दा अतिशय महत्वाचा असून, त्याबाबत जनजागृती करणारी ध्वनिफीत आहे. सर्वसामान्य प्रवाशांपर्यंत रस्ते सुरक्षेची माहिती पोहोचवायला हवी. प्रवासादरम्यान सुरक्षेच्या आवश्यक त्या सर्व बाबी आपण पाळल्या पाहिजेत.” हर्षित देसाई याने यावेळी आपल्या अभिनयाची झलक दाखवली. तसेच वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन केले.
जगदीश सिंह खालसा यांनीही विचार मांडले. राजन जुनवणे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. मेघना एरंडे यांनी सूत्रसंचालन केले. किरण देसाई यांनी आभार मानले.