जागतिक आरोग्य दिना निमित्त अवयवदान जनजागृतीपर भव्य महिला कार रॅलीचे आयोजन

०७ एप्रिल २०२४, पुणे : जागतिक आरोग्य दिनानिमित्त अवयव दानाचे महत्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने पिंपरी येथील डी. पी. यु. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व पिंकहोलिक इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य महिला कार (चारचाकी) रॅली व व्याख्यानसत्राचे आयोजन करण्यात आले होते. हा अवयवदान व जनजागृतीपर कार्यक्रम डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या (अभिमत विद्यापीठ, पिंपरी, पुणे) प्र कुलपती डॉ. भाग्यश्री पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित कार्यक्रमात व रॅली मध्ये महिलांसह त्यांचे कुटुंबीय व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात उस्फुर्त झुंबा नृत्याने झाली व अवयवदानाचा संकल्प करून सर्वानी अवयवदानाची शपथ घेतली. एकूण ४२ किलोमीटरच्या मार्गक्रमणाची सुरुवात संत तुकाराम नगर, पिंपरी, पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयापासून होऊन शहरातील महत्वाच्या पीसीएमसी मेट्रो, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, खडकी छावणी, शिवाजीनगर मार्गे पुन्हा डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पिंपरी च्या प्रांगणात या रॅली ची सांगता झाली. महिला रॅलीला झेंडा दाखवताना शैक्षणिक विभागाच्या संचालिका डॉ. वत्सला स्वामी,रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ एच एच चव्हाण,बहू अवयव प्रत्यारोपण विभागाच्या संचालिका डॉ वृषाली पाटील,सुनील हिरुरकर सहायक पोलिस निरीक्षक व मान्यवर. या रॅली मध्ये ८० चारचाकी गाड्या सहभागी झाल्या होत्या. या गाडयांना विविध माध्यमातून सजविण्यात आले होते. “अवयवदान” या संकल्पनेवर आधारित माहिती फलक, चित्रे, उद्घोषणा, संदेश, वेशभूषा आदींद्वारे अवयवदानविषयक जनजागृती करीत जनसामान्यांचे लक्ष वेधून घेतले हे या रॅलीचे विशेष आकर्षण होते.

बहू अवयव प्रत्यारोपण विभागाच्या संचालिका डॉ.वृषाली पाटील यांनी अवयवदान व प्रत्यारोपणाविषयक माहिती, प्रक्रिया, प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आदी विषयांवर व्याख्यान दिले व अवयवदान मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी विचार मंथन केले.

यावेळी बोलताना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे (अभिमत विद्यापीठ, पिंपरी, पुणे)  कुलपती डॉ. पी. डी. पाटील म्हणाले कि, “जागतिक कसोटीवर तोडीस तोड ठरतील अशा सर्वोत्तम आरोग्य सेवा आपल्या भारतात उपलब्ध करून देण्याच्या आमच्या संकल्पावर आम्ही अतिशय ठाम आहोत व अवयवदानाद्वारे गरजूंचे जीव वाचवून त्यांना उत्तमोत्तम आयुष्य प्रदान करण्याच्या या प्रवासात आजची रॅली अवयवदान जनजागृतीच्या दिशेने टाकलेले आणखी एक पाऊल आहे”.

तसेच “अवयवदान व त्यांची प्रत्यारोपण प्रक्रिया हे माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचे विषय असून रुग्णांना नवजीवन देण्यासाठी परिश्रम घेतलेल्या डॉक्टरांचे योगदान तितकेच महत्वाचे आहे. अवयवदान व प्रत्यारोपण प्रक्रियेतील आमच्या रुग्णालयाचा चढता आलेख पाहता मी माझ्या तज्ज्ञ वैद्यकीय सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करू इच्छिते. अवयवदान व प्रत्यारोपण जनसामान्यांपर्यंत पोचवणे ही काळाची गरज आहे या संदर्भात अधिकाधिक जागृती निर्माण करणे हा माझा मानस असून आजच्या या रॅली व व्याख्यानसत्रातून अवयवदान मोहिमेला बळ मिळत आहे.” असे प्रतिपादन डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या (अभिमत विद्यापीठ, पिंपरी, पुणे) प्र कुलपती डॉ. भाग्यश्री पी. पाटील यांनी केले.

पुढे बोलताना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त व खजिनदार असलेले डॉ. यशराज पाटील म्हणाले की, “अवयवाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या असंख्य रुग्णांना आज गंभीर परिस्थितीशी लढा द्यावा लागत आहे; अशा वेळी अवयवदान त्या रुग्णांसाठी एक वरदान ठरू शकते. सर्वानी अवयवदानाचा संकल्प करावा हाच कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. सामान्य नागरिकांनी एकत्र येऊन असे जागृतीपर उपक्रम करणे गरजेचे आहे, जेणेकरून अशा विविध महत्वपूर्ण विषयांबद्दल जनजागृती होण्यास मदत होईल. आज इथे सहभागी झालेल्या महिलांचे व उपस्थितांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी इथून पुढेही अवयवदानाबद्दल जागृती राहावी असे आवाहन करतो.”