आर्थिक वादातून कुख्यात गुंडाचा-गुंडावर चाकूने सपासप वार

नागपूर : पैशावरून झालेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या कुख्यात गुंडावर दुसऱ्या गुंडाने चाकूने सपासप वार करून खून केला. ही घटना बुधवारी मध्यरात्री दीड ते पावणेदोन वाजताच्या सुमारास इतवारी रेल्वेस्टेशनजवळील यादव कॉलनीत घडली.

दिलीप हरिचंद्र चव्हाण (वय ३५, रा. गोतमारे पेट्रोल पंपाजवळ द्वारकानगर, कळमना) याने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपीस अटक केली आहे.

विजय हरिचंद्र चव्हाण (वय ३३) असे मृताचे नाव असून सागर यादव (वय ३०, रा. यादव कॉलनी) आणि हर्षल कटाले (वय २७, रा. तुलसी नगर) अशी आरोपींची नावे असून दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय आणि सागर हे दोघेही मजुरी करतात.

विजयचा मित्र सुजय बंबानी याला सागरने फोन करून खर्चासाठी पैशाची मागणी केली. मात्र, त्याने पैसे नसल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा फोन लावून सागरने पैसे नको, केवळ भेटायचे असल्याचे सांगत बोलविले.

मात्र, बोलताना तो नशेत असल्याने सुजयला शंका आली. त्याने सागरचेही मित्र असलेले विजय चव्हाण, दिलीप चव्हाण, बादल बरमकर, सय्यद शहाबाद, सय्यद मुजफ्फर यांच्यासह त्याचे घर गाठले. सागरसोबत त्याचा मित्र हर्षल कटालेही होता. दोघे सुजयला भेटले. त्याने पुन्हा सुजयला पैसे मागितले. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाला. विजयने त्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, सागरने त्यालाही शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विजयने त्याला रागात धक्का दिला असता तो खाली पडला. त्यामुळे सागरला राग आला. चाकू काढून त्याने विजयच्या पोटात आणि कमरेवर सपासप वार केले.

त्यामुळे तो खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सागर आणि हर्षल तेथून पळून गेले. दरम्यान चौघांनीही त्याला मेयो रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याबाबत माहिती मिळताच शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला. दरम्यान दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांचा शोध पोलिस घेत त्यांना अटक केली.

परिसरात होती दहशत

विजय चव्हाण हा कुख्यात गुंड असून त्याच्यावर जखमी करणे आणि जिवानिशी ठार करण्याचा गुन्हा दाखल आहे. त्याची परिसरात दहशत होती. विशेष म्हणजे, सागरवरही हल्ला करणे, जखमी करणे आणि विविध गुन्हे दाखल आहेत.