पुणे : मनमोहक नृत्य, सुमधुर गायन यासह विविध कलागुणांचे सादरीकरण, जिंकण्याच्या वृत्तीने खेळत आणि इनोव्हेशन, तंत्रज्ञानाच्या अविष्कारातून विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेचे, उत्साहाचे दर्शन घडवले. निमित्त होते, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे (एआयटी) आयोजिलेल्या ‘अल्केमी २०२४’, आंतरमहाविद्यालयीन क्रीडा-सांस्कृतिक व तंत्रज्ञान महोत्सवाचे! दिघी येथील ‘एआयटी’च्या कॅम्पसमध्ये झालेला ‘अल्केमी-२०२४’ महोत्सव ‘पेस’ (क्रीडा), ‘अमेथिस्ट’ (सांस्कृतिक) आणि ‘सोल्युशन्स’ (तंत्रज्ञान) याचा त्रिवेणी संगम होता. ४० पेक्षा अधिक महाविद्यालयातून जवळपास तीन हजार विद्यार्थ्यांनी महोत्सवात सहभागी घेतला. अमेरिका, इंग्लंड यासह भारतातील सात आयआयटी, पाच आयआयआयटीमधून विद्यार्थी सहभागी झाले होते.
‘पेस २०२४’ क्रीडा महोत्सवात बास्केटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, फुटबॉल, लॉन टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कबड्डी, स्क्वॅश आदी स्पर्धा झाल्या. ‘सोल्युशन्स’मध्ये रोबो रेस, ड्रोन ड्रॅग, शॉर्टेस्ट कोड, बाईक शो, सायबर सिक्युरिटी, रोबो वारस, मॉडेल मेकिंग अशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी आपले तांत्रिक कौशल्य लावत तंत्रज्ञानाचे अद्भुत अविष्कार दाखवले. ‘अमेथिस्ट’मध्ये पथनाट्य, प्रश्नमंजुषा, नाट्य, नृत्य, गायन व अन्य १३ प्रकारच्या स्पर्धा होत्या.
कांस्यपदक विजेता भारतीय तिरंदाज अतुल वर्मा यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले. प्रसंगी ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडीयर (नि.) अभय भट यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. खेळ आपल्याला सतत पुढे जाण्याची प्रेरणा देतात. आपल्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्यासाठी खेळ उपयुक्त असल्याचे वर्मा म्हणाले. स्पर्धेचे बक्षीस वितरण भारतीय ऍथलेट सुमी कलीवरण यांच्या हस्ते झाले. कठोर परिश्रम व स्मार्ट वर्क केले, तर कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचे सुमी कलीवरण म्हणाल्या. सहसंचालक कर्नल (नि.) मनोज कुमार प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.
एआयटी पुणे (क्रिकेट – मुले व मुली), एमएमसीईओई पुणे (कबड्डी), पीआयसीटी पुणे (व्हॉलीबॉल-मुले), झील सीओईआर पुणे (व्हॉलीबॉल-मुली), एआयटी पुणे (बास्केटबॉल-मुले), एमआयटी डब्ल्यूपीयू पुणे (बास्केटबॉल-मुली), एनडीए पुणे (स्क्वॅश-मुले-एकेरी) यांनी विजय मिळवला. गायन स्पर्धेत एमआयटीएडीटी पुणे (सोलो), एएफएमसी पुणे (ड्युएट), जेएसपीएम पुणे (सोलो नृत्य व समूहनृत्य), एएफएमसी पुणे (नृत्य ड्युएट) यांनी यश मिळवले. तांत्रिक स्पर्धेत आयआयटी मंडी, पीआयसीटी, सीओईपी, एमआयटी एडीटी, कमिन्स इंजिनिअरिंग, सिंहगड इंजिनिअरिंग, एआयटी पुणे यांनी यश संपादन केले.